जळगाव : ‘राजकारणात चांगले आणि वाईट दिवस कायम राहत नाही, शिवसेनेत असताना सुरवातीला पोलीस कधीही पकडून न्यायचे, ऐन सणावाराला जेलमध्ये टाकायचे. आता मंत्री झालो. मागं-पुढं गाड्यांचा ताफा असतो.’ असं वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये केलं.पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते.

‘शिवसेनेनं चांगले दिवसही पाहिले आणि सगळे सोडून गेल्यानंतर आलेले वाईट दिवसही भोगले. पण शिवसेनाप्रमुखांमुळं शिवसैनिक कधीही खचला नाही. त्यामुळंच कधीकाळी पानटपरी चालवणारे आपण मंत्रीही झालो.’ असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी गुलाबराव पाटलांनी नारायण राणेंवरही जोरदार टीका केली. ‘शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झालेले नारायण राणे शिवसेना सोडून गेले. त्यावेळी ते म्हणाले होते की, गणपती विसर्जनाआधी शिवसेनेचं विसर्जन होईल. आता ते स्वत: बुडाले पण शिवसेनेचा भगवा आजही डौलानं फडकत आहे.’ अशी टीका त्यांनी राणेंवर केली.

याचवेळी बोलताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी राज्यात युती केली. 25 वर्षापर्यंत आमची युती कायम होती. पण काही लोकांना नको असलेली ही युती विधानसभा निवडणुकीवेळी तुटली आणि शिवसेनेला वेगळं लढावं लागलं. पण तरीही न डगमगता शिवसेनेनं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात तब्बल 63 जागा निवडून आणल्या.’ असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.