गोंदिया : धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दोन वर्षांपासून अनेक प्रयत्न केले. याचे सकारात्मक परिणामही पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेलं सेंद्रिय धान्य विक्री करताना अडचण येऊ नये, तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी लवकरच शासकीय सेंद्रिय तांदूळ आणि धान्य खरेदी केंद्र सुरु केलं जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी याबाबत माहिती दिली. ते गोंदिया, भंडारा जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदी केंद्र आणि राईस मिलर्सच्या बैठकीसाठी आले असताना बोलत होते. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकट्या गोंदिया जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर शेत जमिनीवर खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली जाते. मात्र जिल्ह्यात धान पिकाचं विक्रमी उत्पादन होऊनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती जशास तशी आहे. यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेती तज्ञ अशी ओळख असलेले गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकरी अभिमन्यू काळे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा सल्ला दिला. सदृढ आरोग्य, जैवविविधतेचं संवर्धन आणि पशुपक्षांच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय शेती करून आर्थिक नफा कमवण्याचा सल्ला अभिमन्यू काळे यांनी दिला होता. सोबतच जे शेतकरी सेंद्रिय पद्धतीने धान पिकाची लागवड करतील अशा शेतकऱ्यांसाठी ‘आत्मा’च्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात 51 गट तयार करण्यात आले आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जही उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेंद्रिय शेती ही आरोग्याला फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी जर सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेती केली तर बांधावरचं पाणी तळ्यात आणि नदी पात्रात गेल्यावर देखील तेथील जैवविविधता टिकून राहिल, असं तज्ञांचं मत आहे. तसेच पक्षी आणि मासोळी यांच्यावर कुठलाही विपरित परिमाण होणार नाही. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आणि धान्याला चांगला भाव मिळण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सेंद्रिय तांदूळ हमीभावाने सरकारकडून खेरेदी केला जाईल आणि त्याची विक्री सरकारकडून केली जाईल. धान्य विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासकीय धान्य खरेदी-विक्री केंद्र सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. सिक्कीम हे 2016 साली देशातलं पहिलं सेंद्रिय राज्य बनलं. नुकताच संयुक्त राष्ट्राकडूनही सिक्कीमचा जगातील पहिलं सेंद्रिय राज्य म्हणून गौरव करण्यात आला. सेंद्रिय पद्धतीने शेती करणं ही काळाची गरज बनली आहे. गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केलेले प्रयत्न ही सेंद्रिय शेतीच्या दिशेने रोवलेली मुहूर्तमेढ होती. आता सरकारी पातळीवर यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. यामुळे संपूर्ण राज्य नाही, किमान एक जिल्हा तरी संपूर्ण सेंद्रिय जिल्हा म्हणून ओळखला जाईल.