Gondia News गोंदिया : राज्यात एकीकडे पाणीटंचाईचे भीषण सावट (Water Crisis) असून अनेक गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे. राज्यात असे भयावह चित्र असताना दुसरीकडे मात्र नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारी जलजीवन मिशन योजनेचे साहित्य तकलादू पद्धतीने लावण्यात येत आहेत. याचेच एक जिवंत उदाहरण हे गोंदिया (Gondia News) जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी या गावात बघायला मिळाले आहे.
सुमारे 9 लक्ष रुपये निधी खर्च करून गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी या गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 2 पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र, या पाण्याच्या टाक्या निकृष्ट दर्जाच्या आहेत, अशी ओरड गावकऱ्यांनी आधीच केली होती. अशातच आता त्यातील 1 पाण्याची टाकी अचानक कोसळून पडल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्हे निर्माण होत आहेत. तर ऐन उन्हाळ्यात पाण्याची टाकी तुटून पडल्याने नागरिकांवर जलसंकट देखील ओढावले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
टाकीच्या गुणवत्तेवरुन चौकशीची मागणी
विदर्भात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता उष्णतेच्या पातळीने नवे उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून सध्या एकट्या अकोला शहरात आज 45.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानची नोंद करण्यात आली आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील असेच काहीसे चित्र आहे. मात्र या उष्णतेमुळे अनेक गावातील नैसर्गिक स्त्रोतांनी तळ गाठल्याने जलसंकटाचे मोठे संकट ओढवले आहे.
अशातच आता गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी या गावाला पाणी पुरवठा करणारी एक टाकी अचानक फुटून खाली कोसळल्याने गावातील जलसंकट अधिक गडद झाले आहे. परिणामी, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता या प्रकरणी प्रशासन नेमकं काय कारवाई करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
95 लक्ष खर्च करून केलेली जल जीवन मिशन योजना ठरली फोल
तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महीलांची शेत शिवारातील भटकंती शासनाच्या विविध पाणी योजनांचा समाचार घेण्यासारखी आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर जलजीवन मिशन मोहीम राबविण्यात येत आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पालेवाडा या गावात घरोघरी नळ कनेक्शन लावण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेने ज्या ठिकाणी पाण्याच्या मुख्य स्त्रोतासाठी विहीर खोदली ती जागा चुकीची निवडल्याने जानेवारी महिन्यातच तेथील पाणी आटले आहे. यासह गावातील बोरवेल देखील कोरड्या पडल्याने आता येथील महिलांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
परिणामी, गावातील शेत-शिवारातून महिलांना पाणी आणावे लागत आहे. तर चुकीच्या नियोजनामुळे 95 लक्ष खर्च करून देखील गावकऱ्यांना पाणी मिळत नसेल तर शासनाच्या योजना खरचं नागरिकांसाठी राबविण्यात येतात का ? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर पालेवाडा गावापासून अवघ्या 5 किमी अंतरावर असलेल्या कलपाथरी मध्यम प्रकल्पावर पाण्याची योजना कार्यान्वीत करून पालेवाडावासियांची तहान भागवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या