Gold Price : सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपली कर प्रणाली सुधारण्याच्या उद्देशाने आणि महसूल वाढीसाठी महाराष्ट्र सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा विचार करत आहे.


हवाईमार्गे आयात केलेल्या सोन्यावर महाराष्ट्र सरकार ०.१ टक्के मुद्रांक शुल्क आकारत आहे. तर, इतर राज्यांमध्ये हे शुल्क नसल्याने इतर राज्यांमध्ये सोन्याची आयात होत आहे. परिणामी राज्यातील सोने आयातीच्या प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून आले आहे. सोने आयातीवर असलेल्या जीएसटीमुळे आधीच राज्य सरकारच्या महसूलावर परिणाम होत आहे. सोन्यावरील मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यास राज्याच्या महसुलात वाढ होऊ शकते, असे सूत्रांनी म्हटले. 


राज्य सरकारने मुद्रांक शुल्काचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी, इतर राज्यांशी तुलना करण्यासाठी, मुद्रांक शुल्क माफ करायचे असल्यास त्याचा राज्याच्या महसुलावर आणि उद्योगांवर होणारा परिणाम आणि रोड मॅपची शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. एका महिन्यात ही समिती अहवाल सादर करणार आहे. 


सराफा आणि ज्वेलर्स उद्योगाच्या मागणीनंतर ही समिती स्थापन करण्यात आल्याचे राज्याच्या अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्ली, चेन्नई आणि इतरत्र सोन्याच्या आयातीवर मुद्रांक शुल्क नाही. त्यामुळे त्यावरील कर कमी असल्याने व्यापारी या ठिकाणांहून सोने आयात करत आहेत. त्यामुळे राज्याच्या महसूलावर परिणाम होत आहे. 


सोने स्वस्त होणार 


राज्य सरकारने हा निर्णय घेतला तर सोन्याच्या आयातीत दुपटीने म्हणजे दोन हजार टन इतकी होण्याचा अंदाज असल्याचे जळगावमधील सोने व्यावसायिक आणि सोने व्यापारी असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी सांगितले.  मोठ्या प्रमाणात मुंबई मार्गाने महाराष्ट्रात  सोने आयात वाढण्याची शक्यता आहे आणि असे झाले  महाराष्ट्र सरकारचा जीएसटी कर मोठ्या प्रमाणात वाढेल आणि राज्याचे अर्थचक्र सुधारणार. त्याच्या परिणामी राज्याचा सर्वांगीण विकासावर थेट परिणाम होणार आहे.


सध्या दिल्ली येथे सोन्याची आयात होत असल्याने आणि त्या ठिकाणाहून ते भारतात वितरित केले जाते. तेथून सोने महाराष्ट्रात आणताना त्याचा वाहतूक खर्च हा ग्राहकांच्या माथी मारला जातो. मुद्रांक शुल्क माफ झाले तर सोन्याची आयात दिल्ली ऐवजी मुंबईमध्ये होईल. राज्य सरकारला जीएसटीचे उत्पन्न तर मिळेलच या शिवाय व्यापाऱ्यांना ही खर्च कमी लागणार आहे. सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट होणार आहे. सोन्याच्या दरात किमान पाचशे रुपये प्रति तोळा दर कमी होणार आहे. त्यामुळे सोन्याच्या वरील मुद्रांक शुल्क सरकारने माफ केले तर आम्ही त्याच स्वागतच करू अशी प्रतिक्रिया सोने व्यावसायिकांनी दिली आहे.