Gokul Milk News : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. गोकुळ दूध संघाने म्हैस आणि गायीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ उद्यापासून म्हणजे 1 एप्रिलपासून देण्यात येणार आहे. गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना ही गुढी पाडव्याची भेट आहे. दूध दरात वाढ करण्याच्या निर्णयामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 


नेमकी किती करण्यात आली वाढ


1 एप्रिलपासून म्हैस आणि गायीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय गोकुळ दूध संघाने घेतला आहे. म्हैशीच्या दुधाची खरेदी ही आता 43.50 रुपये प्रती लिटरने केली जाणार आहे. यापूर्वी म्हशीचे दूध हे 41.50 प्रती लिटरने खरेदी केले जात होते. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे गायीचे दूध हे आता 29 रुपये लिटर दराने खरेदी केलं जाणार आहे. पूर्वी गायीचे दूध हे 27 रुपये प्रती लिटरने खरेदी केलं जात होते.


दरम्यान, काल (30 मार्च) गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढ करुन कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीत दिलासा देण्याचं काम गोकुळनं केलं असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. गोकुळ दूध संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी असतो. नवीन सत्ता आल्यानंतर दहा महिन्याच्या आता दुसऱ्यांदा दूध दरात वाढ केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी गोकुळ नेहमीच त्यांच्या पाठिशी असेल अशी माहितीही विश्वास पाटील यांनी दिली.


कोरोना संकटाचा मोठा फटका सर्व क्षेत्रांना बसला होता. दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला होता. सध्या जनावरांसाठी लागणाऱ्या खाद्यांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. असा स्थितीत गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरात केलेली वाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. 
महागाईच्या काळात दूध दरात झालेली दरवाढीमुळं शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे.