मुंबई : चंद्रशेखर आझाद यांच्या मुंबई आणि पुण्यातल्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही चंद्रशेखर आझाद यांनी पुण्याला जाण्याचा निर्धार केला आहे. चंद्रशेखर आझाद यांना मालाडच्या हॉटेल मनालीमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी मनाली हॉटेलच्या 500 मीटर परिसरात जमावबंदी लागू केली आहे.  दरम्यान आझाद यांच्या समर्थकांनी हॉटेलबाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं होतं.

दरम्यान, भीम आर्मीला महाराष्ट्रात 2 जानेवारीपर्यंत सभा घेण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. याशिवाय कार्यकर्त्यांनाही जवळच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याशिवाय कोरेगाव भीमा इथं 2 तारखेपर्यंत जाण्यासही भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आला आहे. सध्या ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यांना बॉन्डवर सोडून देण्यात आलं आहे.

चंद्रशेखर आझाद यांची काल वरळीच्या जांबोरी मैदानात सभा होणार होती. वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. शिवाय सर्व पोलीस स्टेशनवर अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उद्या पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या व्याख्यानालाही परवानगी नाकारली आहे.

पोलिसांनी आपल्याला रूममध्ये बंद करून ठेवले आहे, अशा आशयाचा चंद्रशेखर आझाद यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. येणाऱ्या निवडणुकीत मोदी सरकारला हे महागात पडेल. . मोदी सरकारने हे युद्ध सुरु केले असून याचा अंत भीम आर्मी करणार, असा इशाराही आझाद यांनी या व्हिडीओत दिला आहे. दरम्यान मुंबई पोलीस आझाद यांना विमानात बसवून देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राज्यात विविध ठिकाणी पाच सभा नियोजित होत्या. त्यातील पहिली सभा 29 डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी 4 वाजता होणार होती. त्यानंतर 30 डिसेंबरला पुण्यात सभा, 31 डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान, 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, 2 जानेवारीला लातूर येथे सभा त्यानंतर 4 जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा असा नियोजित कार्यक्रम होता.

संबंधित बातम्या
चंद्रशेखर आझादांची मुंबईतील सभा रद्द, पुण्याला जाण्यासही बंदी

नजरकैदेतल्या चंद्रशेखर आझाद यांचा पुण्याला जाण्याचा निर्धार | मुंबई | एबीपी माझा


महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री बहुजन समाजाचा : चंद्रशेखर आझाद


EXCLUSIVE | भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची विशेष मुलाखत | एबीपी माझा