सांगली : मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जावं आणि भेटवस्तू द्यावी, असा अजब सल्ला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.


सांगली महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आतापासूनच मैदानामध्ये उतरवलं आहे. भाजपनेही महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आज सांगलीमध्ये भाजपने कार्यकर्त्यांचं बूथ प्रशिक्षण आयोजित केल होतं. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना हा सल्ला दिला.

''बूथ रचना झाली आहे, 15 दिवसात कार्यकर्त्यांनी 200 घरी जाऊन मतदारांशी संपर्क वाढवला पाहिजे. भेट घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना भेटवस्तू द्या, '' असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून 18 नाही, तर 28 नगरसेवक आले तरी त्यांना भाजपात घेऊ. फक्त त्यांची पार्श्वभूमी बघून प्रवेश देणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.