Maharashtra Pandharpur News: तमाशा कला केंद्रात 18 वर्षाच्या मुलींना लावणी सादर करण्यासाठी उभं करू नये आणि डीजेलाही कला केंद्रात बंदी आणावी अशा पद्धतीचे निर्णय मोडलिंब येथे झालेल्या राज्यस्तरीय तमाशा कलावंत, कलाकेंद्र कलाकार आणि मालकांच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र या निर्णयाला काही कलाकारांनी आक्षेप घेत हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं. राज्यातील लावणी आणि तमाशा कलावंतांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व तमाशा केंद्र, लावणी कलाकेंद्र येथील कलाकार, वादक, गायक आणि थिएटर मालक यांची माढा तालुक्यातील मोडलिंब येथे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील बहुतांश आघाडीचे लावणी कलाकार, कलाकेंद्र मालक यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्या पुढाकारानं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 


या बैठकीमध्ये अठरा वर्षाच्या खालील मुलींना तमाशा केंद्रात कलावंत म्हणून आपली कला सादर करता येणार नाही आणि तमाशा, संगीत पार्ट्यांमध्ये डीजेला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय नियमानुसार, 18 वर्षांखालील मुलींना कला केंद्रात कला सादर करणं गुन्हा ठरत असल्यानं याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 18 वर्षांपेक्षा लहान मुलगी कलाकेंद्रात नको अशी भूमिका जाहीर करण्यात आली. याशिवाय डीजेमुळे पारंपरिक वादक आणि गायकांच्या पोटावर पाय येणार असल्यानं डीजेवर देखील बंदी घालण्यात आल्याचं वसंत गाडे यांनी सांगितलं आहे. 


या लहान मुलींना नाचाची आणि गायनाचे शिक्षण दिल्याशिवाय त्या स्टेजवर कशा कला सादर करणार? अशी विचारणा यावेळी लावणी कलावंतांनी केली. या लहान मुलींना नृत्याचं शिक्षण याच कलाकेंद्रात द्यावं लागतं आणि त्या तयार झाल्यानंतर 18 वर्षानंतर त्यांना स्टेजवर कला सादर करायला पाठवलं जातं, अशी भूमिका ज्येष्ठ लावणी कलावंत उमा इस्लामपूरकर यांनी मांडली. कोणत्याही कलाकेंद्रात 18 वर्षांपेक्षा लहान मुली स्टेजवर येणार नसल्या तरी त्यांना तयार करायला त्यांना कलाकेंद्रात यावंच लागेल असं वैशाली वाफळकर यांनी सांगितलं. या बैठकीतून आमचे प्रश्न सुटले असं वाटत नसल्याचं सांगताना आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनानं पुढाकार घेऊन त्यांना राहण्यासाठी शहरात वसतिगृह असली तर ते शिक्षण घेतील, असा दावा वैशाली यांनी केला. 


कोण गौतमी पाटील? अश्लील नृत्य करून ती काय करते, सगळ्यांना माहित आहे, गौतमी पाटीलवर साधला निशाणा 


सध्या आमच्या समाजातील केवळ 5 टक्के मुली परिस्थितीमुळे कलाकेंद्रात असून बाकीच्यांची मुलं चांगलं शिक्षण घेऊन डॉक्टर आणि अधिकारी बनत आहेत. फक्त शासनानं आमच्या मुलांना शिक्षणासाठी पाठबळ दिलं तर आमचे प्रश्न सुटतील, असा दावाही यावेळी वैशाली वाफळकर यांनी केला. यावेळी बोलताना कोण गौतमी पाटील असा सवाल करत अश्लील नृत्य करून ती काय करते सगळ्यांना माहित आहे, असं सांगत 5 किलोची घुंगरं पायात बांधून आणि नखशिखांत कपड्यानं झाकून आम्ही आमची कला सादर करतो, असं सांगत या कलावंतांनी गौतमी पाटीलवर देखील निशाणा साधला.