कोल्हापूर : तुम्हाला कसा नवरा हवा? असा प्रश्न मुलींना विचारला… तर हमखास मला डॉक्टर हवा, इंजिनिअर हवा किंवा नोकरदार हवा असंच उत्तर येतं. कुणालाही शेतकरी नवरा नको असतो. हीच विचारसरणी मोडीत काढत बेळगावजवळ एक अनोखा वधूवर मेळावा भरवण्यात आला होता.


बेळगाव जवळच्या मलिकवाडमध्ये हा अनोखा वधू-वर मेळावा पार पडला. जिथं डॉक्टर, इंजिनिअर, नोकरदार नाही, तर शेतकरी पोरांना महत्त्व होतं.

या मेळाव्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या तब्बल 350 मुली आणि 950 मुलांनी नोंदणी केली.

बरं इथं आलेल्या मुलीही उच्चशिक्षित आहे. कुणी शिक्षिका आहे, तर कुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहे. तर कुणी पदवीत्तर शिक्षण घेते आहे. मात्र, तरीही या मुलींनी शेतकरी नवराच हवा असा आग्रह धरला आहे. या मेळाव्यानं शेतकरी पोरांनाही दिलासा दिला आहे.

शिकलेला, नोकरीला असणारा, स्वत: चा व्यवसाय करणारा मुलगा चांगला असा शहराकडच्या पोरींचा समज. पण अन्नदाता शेतकरीही कोणत्याही पेशातल्या मुलांपेक्षा कमी नाही, हेच या मेळाव्यानं सिद्ध केलं आहे.