हिंगोली : एकीकडे परीक्षेच्या नावाने बोंब ठोकाणाऱ्या किंवा परीक्षा म्हटल्यावर नाकं मुरडणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी कोणत्याही संकटकाळी मोठ्या धैर्याने परीक्षेला सामोरं जाण्याची ताकद दाखवणारे विद्यार्थीही कमी नाहीत. हिंगोलीतील एका विद्यार्थिनीच्या धैर्य आणि धाडसाचं म्हणूनच कौतुक केले जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातील डीग्रस कऱ्हाळे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात दहावीचा पहिला पेपर आज पार पडला. या विद्यालयात पहिल्या पेपरला 305 पैकी 296 विद्यार्थी उपस्थित होते. आपल्याला प्रश्न पडला असेल की यात नवल काय? परीक्षा देणाऱ्या 296 विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थिनी अशी आहे, जिने आपल्या सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. पूजा हनवते असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
आज पहाटे 3 वाजता पूजाच्या वडिलांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. पूजासह हनवते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही पूजा काळजावर दगड ठेवून सकाळी 11 वाजता दहावीच्या पेपरला हजर राहिली.
एकीकडे हात-पाय दुखले तरी पेपर देण्यास टाळाटाळ करणारे विद्यार्थी आहेत, पेपर अवघड गेला अशी कारणे देणारी आहेत, अभ्यास नाही झाला तर जीवाचं बर वाईट करणारे विद्यार्थी आहेत, तर दुसरीकडे वडिलांचं पार्थिव घरी सोडून परीक्षा द्यायला येणारी पूजा आहे.
पूजा हनवते लोहगाव येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेते. आपल्या विद्यार्थिनीच्या वडिलांचे निधन झाले आहे, तिचा वर्ष वाया जाऊ नये, म्हणून पूजा शिकत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेच्या शिक्षकांनी पूजाच्या घरी जाऊन तिला धीर देऊन पेपर देण्यासाठी प्रोत्साहन दिले.
वडिलांचे निधन झाल्यानंतरही आयुष्यात न थांबता पूजाने दहावीचा पेपर देऊन आपल्या सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
पहाटे 3 वाजता वडिलांचा मृत्यू, सकाळी 11 वाजता पूजा दहावीच्या पेपरला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2018 07:43 PM (IST)
एकीकडे हात-पाय दुखले तरी पेपर देण्यास टाळाटाळ करणारे विद्यार्थी आहेत, पेपर अवघड गेला, अभ्यास नाही झाला तर जीवाचं बर वाईट करणारे विद्यार्थी आहेत, तर दुसरीकडे वडिलांचं पार्थिव घरी सोडून परीक्षा द्यायला येणारी पूजा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -