कोल्हापुरात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा पोलीसाकडूनच विनयभंग
एबीपी माझा वेब टीम | 16 May 2019 06:00 PM (IST)
पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा पोलीस कर्मचाऱ्यानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोल्हापूर शहरात घडली आहे.
प्रातिनिधिक फोटो
कोल्हापूर : पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा पोलीस कर्मचाऱ्यानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोल्हापूर शहरातील राजारामपुरी ठाण्यात घडली आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी चेतन घाडगे यावर कलम 354 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या पाठीवरुन हात फिरवणे आणि विशिष्ट भाषेत बोलल्याने या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर तो कर्मचारी ड्युटीवर असतानाच त्याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत तपास करण्यात येत आहे. तपास केल्यानंतर योग्य कारवाई करु असं आश्वासन यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलं आहे. पोलीस ठाण्यातच अशा प्रकारची घटना घडल्याने अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.