बीड : मुंडे साहेब तारीख बदलणारे नव्हते, ते इतिहास बदलणारे होते, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बीडमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होती, त्यावेळी ते बोलत होते.


अजित पवारांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा

"राजकारण किती खाली गेलंय. मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर असं बोलता. एकच गोष्ट अजित पवार यांनी लक्षात ठेवावी, मुंडे साहेब तारीख बदलणारे नव्हते, ते इतिहास बदलणारे होते.", अशी टीका मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर केली. शिवाय, उभ्या महाराष्ट्रात मुंडे साहेबांचा अपमान कदापि सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

ताई, बीड जिल्हा परिषदेची सत्ता तुमच्या हाती येणार आहे, असे म्हणत आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेंना विश्वास दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उठले, त्यावेळी उपस्थित लोकांनी आरडा-ओरड सुरु केली, "आवाज... आवाज....", तर त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, "हळू हळू वाढेल आवाज. काळजी करू नका"

केवळ भाषणातून विकास होत नाही : मुख्यमंत्री

"ज्या वेळी आमचं सरकार आलं, त्यावेळी राज्यात भयाण दुष्काळ आला. 8,000 कोटी रुपयांची थेट मदत दिली. केवळ भाषणातून लोकांचा विकास होत नाही. राज्यातील 40 हजार गावांपैकी 20 हजार गावं दुष्काळात जातात. सरकारला 5 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा दुष्काळमुक्त असेल. जलयुक्त शिवारमुळे गावात पाणी थांबलं गेलं.", अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बीडवासियांना दिली.

बीड जिल्ह्यातील प्रत्येकाला घर देण्याचं आश्वासन 2018 पर्यंत पूर्ण करणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उपस्थित बीडवासियांना दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी 15 वर्षांत जेवढी शौचालयं बांधली, तेवढी शौचालयं आमच्या ग्रामविकास खात्याने दोन वर्षात बांधली. दोन वर्षात आमच्या सरकारने 26 लाख शौचालयं बांधील, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.