वर्धा : लहान मुलांचा वाढदिवस म्हटल्यावर काहीतरी वेगळं करण्याचा बेत पालकांचा असतो. वर्ध्यातील आर्वी तालुक्याच्या नेरी मिर्जापूर येथे असाच वेगळ्याप्रकारे वाढदिवस साजरा करण्यात आला. तोही एका चिमुकलीचा. खाऊसाठी गोळा केलेले पैसे पानी फाऊंडेशनला दान करत शेताच्या बांधावर चिमुकल्या अनुष्काचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
नेरी मिर्जापूरमधील हॉटेल व्यावसायिक योगेश नागदेवते यांना काही दिवसांपूर्वी अपघातात दुखापत झाली. त्यांच्या दोन्ही हातांवर सध्या उपचार सुरु आहेत. दुसरीकडे गावातील लोक जलसंधारणाच्या कामाला हातभार लावत आहेत. मात्र, आपल्याला दुखापत झाल्याने योगेश नागदेवते सहभागी होऊ शकत नाहीत. ही खंत त्यांच्या मनात होती. मग त्यांना अनोखी कल्पना सूचली.
योगेश नागदेवते यांनी आपली मुलगी अनुष्काचा पहिला वाढदिवस शेताच्या बांधावर साजरा करण्याचा निर्णय घेतला. गावचे सरपंच बाळा सोनटक्के यांनी सुद्धा या संकल्पनेला होकार दिला.
आज सकाळी गावकऱ्यांनी श्रमदान करत, नागदेवतेंच्या चिमुकलीचा वाढदिवस शेताच्या बांधावर केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला.
शेताच्या बांधावर सर्वत्र ‘हॅप्पी बर्थ डे अनुष्का’चा स्वर घुमू लागला आहे. सर्व ग्रामस्थांनी तिला भरभरुन आशीर्वाद दिले. खाऊ पण दिला. पण योगेश हे स्वत: श्रमदानाला हातभार लावू शकत नसल्याने खाऊचे आलेले पैसे त्यांनी पानी फाऊंडेशनला देऊ केले आहेत.
श्रमदानाला माजी आमदार दादाराव केचे, महसूल विभागाच्या कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहभागी होत गावकऱ्यांचा उत्साह वाढविण्यास मदत केली. या उपक्रमाने सुद्धा गावकऱ्यांना दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अनुष्काचा वाढदिवस बळ देणारा ठरेल, यात तीळमात्र शंका नाही.