नाशिक : 'आम्ही राष्ट्रवादी सोडून जाणार नाही', अशी शपथ राष्ट्रवादीला आता घ्यावी लागत आहे. आज अशी शपथ घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र राष्ट्रवादीतले अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. सध्या माझा निम्मा दिवस भाजप प्रवेशाची यादी पाहण्यातच जात आहे, असेही महाजन म्हणाले.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, सध्या माझ्याकडे 50 च्या वर लोकांची यादी आहे, जे भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत. माझा निम्मा दिवस ही यादी बघण्यातच जात आहे. माजी आमदारांसोबत आजी आमदारही या यादीत आहेत असेही महाजन यांनी सांगितले आहे.

सोबतच मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही, मी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्येही नाही, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाजनादेश यात्रेला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून ही यात्रा 7-8 जळगावला येणार आहे. तसेच नाशिकला या यात्रेच्या समारोपाला अमित शाह किंवा नरेंद्र मोदी येतील, असेही ते म्हणाले.

यावेळी नाशिकच्या पूरस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये अतिवृष्टी सुरु असून प्रशासन सर्व काळजी घेत आहे. चांदोरी, सायखेडा तसेच काझीगडीवरील नागरिकांना स्थलांतरित केले आहे. पाऊस थांबत नसल्याने वेळ पडल्यास आम्ही मिल्ट्रीलाही पाचारण करू, असे महाजन म्हणाले.

मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वेसेवा बंद आहे, धोका नको म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. मुंबईतून पाणी बाहेर जात नसल्याने परिस्थिती अवघड झाली आहे, असं ते म्हणाले. जायकवाडी 100 टक्के भरेल असं वाटत आहे, 3 दिवसात 30 टीएमसी पाणी तिकडे सोडण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.