मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याच्या आरोपांना भाजप नेते गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत रात्रंदिवस फिरणारेच आम्हाला घ्या म्हणून फोन करत आहेत, असा दावा महाजनांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केलं.

लोक फोडण्याचं काम नाही, पण जे लोक आमच्याकडे येत आहेत, त्यांना घेण्याचं काम आम्ही करतोय. आचारसंहितेला फक्त तीन महिने आहेत. वेळ कमी आहे. ही 20 - 20 ची मॅच आहे. पुढचा काळ आमचाच आहे, असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केला.

आमच्या संपर्कात कोण आहेत याची यादी मी अशोक चव्हाणांना सांगितली तर त्यांचे उजवे-डावेही त्यांच्यासोबत राहणार नाहीत. त्यांच्यासोबत रात्रंदिवस फिरणारे आम्हाला घ्या म्हणून फोन करत आहेत. त्यांची नावं आता मी उघड करणार नाही, पण 'त्यांची' अशी 25 जणं आमच्या संपर्कात आहेत, असा दावा महाजनांनी केला.



प्रत्येकाला मंत्रीच करु असं नाही, आमच्याकडून जे शक्य आहे तेवढाच शब्द आम्ही देतो. सगळ्याच आमदारांना आम्ही घेऊन तिकीट देऊ शकणार नाही. कारण आमचीही त्या-त्या ठिकाणी लोकं आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. जो शब्द मुख्यमंत्र्यांनी येणाऱ्यांना दिलाय तो आम्ही पाळू. राधाकृष्ण विखे पाटलांच्या पक्षप्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी आहे, त्यांना कुठलं मंत्रिपद द्यायचं, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले.

विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी 50 च्या वर जाणार नाही. जसं मी लोकसभेला नाना पाटोलेंना सांगितलं होतं की त्यांना विरोधीपक्ष नेते पदही मिळणार नाही. 54 च्या वर येऊन दाखवा असं चॅलेंज दिलं होतं, राज्यातही विरोधकांची तीच परिस्थिती करुन टाकू, असं गिरीश महाजनांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला होता. काँग्रेसच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री आणि काँग्रेस सोडून गेलेले नेते फोन करुन भाजपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं चव्हाण म्हणाले. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपमध्ये दाखल होत आहेत. तसंच काही काँग्रेस आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी हा आरोप केल्याचं म्हटलं जातं.