औरंगाबाद : ''आधी डल्ला मारला आणि आता हल्लाबोल करत आहेत,'' अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चावर टीका केली. मराठवाड्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यानिमित्त ते आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये बोलत होते.


पैठणमध्ये शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्घाटन कार्यक्रम झाला. आम्ही एकटेच लढणार आणि जिंकणार, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं. शिवाय 2019 नंतर भाजप सत्तेत राहणार नाही, असं सूतोवाचही त्यांनी केलं.

तुम्ही देश सांभाळा आणि आम्ही राज्य सांभाळतो, असं म्हणत आतापर्यंत भाजपसोबत होतो. मात्र देशही यांच्या हातात आणि आता घरात घुसले आहेत. घरात घुसल्यानंतर काय करावं लागतं, हे तुम्हाला माहित आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला.

भाषण सुरु असतानाच लाईट गेली

उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चावर आणि सरकारवर टीका करत होते. मात्र भाषण सुरु असतानाच लाईट गेली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पण उद्धव ठाकरे यांनी भाषण न थांबवता ते समोर आले आणि विनामाईकचं भाषण सुरुच ठेवलं. दरम्यान, भाषण सुरु असतानाच लाईट गेल्याने आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली.