मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी यंदाही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून त्याची घोषणा गुरुवारी  कोकण रेल्वेने केली. सुरुवातीला 150 विशेष गाडया सोडण्यात येणार आहे. सर्वप्रथम 72 त्यानंतर आणखी 40 ट्रिप्स आणि आता 38 फेऱ्या वाढविण्यात येत आहेत असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज जाहीर केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने गणेशोत्सवानिमित्त यंदाही मुंबई व परिसरातून कोकणात जाणाऱ्यांसाठी शासनाकडून विलगीकरण आणि करोना चाचणीची अट बंधनकारक केली जाऊ शकते.


गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या आता एकून 150 फेऱ्या होणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेने आधीच जाहीर केले आहे अशा 72 फेऱ्या, त्यानंतर मध्य रेल्वेने जाहीर केलेली अतिरिक्त ट्रेनच्या 40 फेऱ्या आणि सध्य परिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आत्ता 38 फेऱ्या भारतीय रेल्वेच्या जाहीर केल्या असून, अश्या एकून 150 गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. याचे नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आहे.






कोकणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवासाची काळजी केंद्र सरकार घेईल. कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण आम्ही येऊ देणार नाही. तसेच, मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये ज्या काही अडी-अडचणी असतील, त्यांचे प्रश्न आम्ही सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, असे मंत्री दानवे यांनी सांगितले.या पुढे देखील वेटींग लिस्ट वाढली तर आणखी सोय करण्यात येईल. कुठल्या ही प्रवाशांना त्रास होऊ देणार नाही, असे दानवे म्हणाले.