मनमाड : घरात किंवा मंडळात गणपतीचं नेहमीच आगमन होतं. मात्र धावत्या रेल्वेमध्ये आपण गणेशाची स्थापना केल्याचं कधी पाहिलं आहे का? गेल्या एकवीस वर्षांपासून मनमाड इथून सकाळी सुटणाऱ्या चाकरमान्यांची हक्काच्या मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाची वाजत गाजत प्रतिष्ठास्थापना करण्यात आली.




मनमाड रेल्वे स्थानकात सकाळपासूनच फलाट क्रमांक 4 वर नेहमीप्रमाणे गोदावरी एक्सप्रेस आली. मात्र आज या गाडीच्या पासधारकांच्या बोगीत काही वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. निमित्त होतं ते या गाडीत होणाऱ्या श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेचं. मनमाड ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई असा प्रवास करणारे सर्वधर्मीय चाकरमानी या गाडीत गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करतात. यंदाही इथे नेहमीप्रमाणे एक दिवसआधीच पासधारक बोगीला आर्कषक सजावट करुन सकाळी गाडी जाण्याआधी श्रींची मान्यवरांच्या हस्ते विधवत पूजा आरती केली.



विशेष म्हणजे दरवर्षी वेगवळे सामाजिक संदेशाचे पोस्टर लावून समाजप्रबोधनाचं काम केलं जातं. गाडीची वेळ होताच गाडीचा रोजचा प्रवास सुरु होतो आणि गणपती बाप्पांचा दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास सुरु होतो. प्रत्येक स्टेशनवर चढणारा प्रवासी गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि आमचा प्रवास सुखरुप होऊ दे, प्रवासात कुठलंही विघ्न येऊ नये, शी प्रार्थना करतो.