मुंबई :  मुंबईत तब्बल दोन वर्षांनी मोठ्या धुमधडाक्यात आणि तितक्याच मनोभावे साजरा केलेल्या गणेशोत्सवानंतर आज सकाळपर्यंत गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाची मिरवणूक तर तब्बल 22 तास चालली आणि त्यानंतर गिरगाव चौपाटीवर आज सकाळी लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर तर अक्षरशः भक्ताचा जनसागर उसळला होता.राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर त्याची मनोभावे आरती करण्यात आली. त्यानंतर राजासाठी आणलेल्या खास तराफ्यातून महासागरात राजाचं विसर्जन करण्यात आलं.


पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक 29 तास चालली


कोरोनामुळे यंदा दोन वर्षांनी गणपती विसर्जनाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यंदा विसर्जन मिरवणुकीवरील सर्व निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या उत्साहात सुरु होती. मात्र काही मंडळांच्या बेजबाबदारपणामुळे मिरवणूक खोळंबली.  त्यामुळे यंदा पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक 29 तास चालली


सांगलीत 26 तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार


ध्वनीवर्धकाचा दणदणाट, अमाप उत्साह, काटेकोर नियोजनामध्ये मिरजेतील गणेशाची विसर्जन मिरवणुक शनिवारी सकाळी शांततेत पार पडली. तब्बल 26 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीची सांगता शहर पोलीस ठाण्यातील श्रींच्या विसर्जनाने झाली. यावेळी बंदोबस्त मध्ये सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हम हिंदुस्थानी गीतावर ठेका धरला. शुक्रवारी सकाळी विसर्जन मिरवणूक सुरु झाली होती. बहुतांशी मंडळानी ध्वनीवर्धक भींती आणि नेत्र दीपक लेसर शोचा वापर केला असला तरी मोजक्या मंडळांनी धनगरी ढोल, झांजपथकासह वाद्यवृंदाचा आनंद दिला.