मुंबई : दोन वर्षांनंतर राज्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा झाला. गणेशभक्त बाप्पाच्या चरणी भरभरुन दान करत असतात. मात्र यंदा बाप्पानेच व्यापाऱ्यांना भरभरुन दिलंय. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे.कारण यंदा महाराष्ट्रात तब्बल नऊ हजार कोटींची उलाढाल झाली आहे
कोरोनानं (Coronavirus) महागाईनं उच्चांक गाठला होता. बेरोजगारीनं दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत होते. पण दोन वर्षांनी बाप्पा आले आणि मार्केटमधील सगळी मरगळ दूर केली. महाराष्ट्रामध्ये 30 टक्क्यांनी मार्केटमधली उलाढाल वाढली आहे दसरा आणि दिवाळीत गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक व्यापार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावर दसरा आणि दिवाळीत 75 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त विक्री होण्याची शक्यता आहे.
सणासुदीच्या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या वर्षीचा गणेशोत्सव तर मिठाईवाल्यांना जास्तच गोड झाला आहे. कारण मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा 25 ते 30 टक्के जास्त उलाढाल झाली आहे. खाद्य तेलाच्या मागणीतही गणेशोत्सवात वाढ झाली आहे.
दरवर्षी देशात 14 ते 15 हजार कोटींची खाद्य तेलाची उलाढाल होत असते. प्रामुख्याने सणासुदीत ही मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ही मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात वार्षिक दीड हजार कोटींची उलाढाल होत असते अशात गणेशोत्सवाच्या काळात राज्यात अंदाजे 60 कोटींहून अधिकची खाद्य तेलाची उलाढाल झाली आहे. बाजारात खाद्य तेलाच्या मागणीत होत असलेली वाढ, आणि साठा उपलब्ध होत असल्यानं बाजारातील मरगळ दूर होत आहे. त्यामुळे बाप्पा हा यंदा खऱ्या अर्थानं विघ्नहर्ता ठरला आहे.. ज्याने बाजारावरचं मंदीचं विघ्न दूर केले आहे.