मुंबई : गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट... आज श्री गणेश चतुर्थी... (Ganesh Chaturthi) ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन झाले आहे.   घरोघरी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना झालेली आहे.  घरी आलेला, सर्वांचाच लाडका  पाहुणा काहींच्या घरी दीड, पाच, सात, दहा दिवसाचा पाहुणचार घेऊन आता आपल्या गावी पुन्हा जाणार आहेत. 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या'च्या गजरात घरगुती गणपतीचं विसर्जन (Ganesh Visarjan 2022) करण्यात येणार आहे.


 गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. त्याच पद्धतीने गणपती विसर्जन करण्यापूर्वी गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. गणपतीची विसर्जन पूजा विधी कशी करावी याची विधिवत पद्धत पंचागकर्ते मोहन  दाते यांनी सांगितली आहे. 


गणपती विसर्जन पूजा विधी



  • गणपतीला दूर्वा, फुले आणि फुलांचे हार सर्व गणपतीसमोर ठेवा

  • त्यानंतर उदबत्ती लावावी आणि घंटी वाजवून उदबत्ती ओवळावी

  • यानंतर तूपाचे निरंजन लावायचे

  • गणपतीला नैवेद्यासाठी तयार केलेला नैवेद्य किंवा आवडणारे मोदक, लाडू, मिठाई मूर्तीसमोर एका पात्रत ठेवावे

  • त्यानंतर पाणी ओवाळून तो नैवेद्य बाप्पाला दाखवावा

  • गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत.

  • त्यानंतर एक पळीभर पाणी ताम्हाणामध्ये सोडावे. 

  • एक फूल गंधामध्ये टेकवून गणपतीच्या पायावर वाहा

  • समोर दोन पाने, खारीक, खोबरे, सुपारी, सुटे पैसे असा वीडा मांडा आणि त्यावर थेंबभर पाणी सोडा

  • विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती करावी

  • गणपतीची आरती झाल्यानंतर आता मंत्रपुष्पांजली म्हणा

  • मंत्रपुष्पांजलीनंतर अक्षता आणि फुले गणपतीला वाहा

  • गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी.

  • गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात.

  • घरात उपस्थित असलेल्या कुटुंबातील सर्वांनी गणपतीला अक्षता, फुले, वाहून नमस्कार करा 

  • नमस्कार झाल्यानंतर गणपतीवर अक्षता वाहत गणपती जागेवरून थोडासा हलवायचा आहे. 


श्रीगणेश उत्तर पूजन साहित्य



  • हळद - कुंकु

  • अष्टगंध - शेंदूर

  • उगाळलेले गंध - चंदन

  • हार - फुलं (काही लाल रंगाची फुलं असावीत)

  • दूर्वा

  • अक्षता

  • नैवेद्य (मुख्य नैवेद्य, मोदक, पेढे, इ.)

  • ताम्हन - दोम, पळी - दोन, तांब्या

  • आसन / पाट - दोन

  • पाणी टाकण्यासाठी पातेलं


 गणपतीवर अक्षता टाकल्यानंतर आणि गणपतीची मूर्ती हलव्यानंतर गणपतीचे विसर्जन झालेले आहे. त्यामुळे  जिथे विसर्जनासाठी जाणार असाल तिथे पुन्हा आरती, नैवेद्य काहीही करण्याची आवश्यकता नाही.