CM Eknath Shinde : पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात वाजत-गाजत आज राज्यभरात लाडक्या 'बाप्पा'ला निरोप देण्यात येत आहे. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज सर्वत्रच बाप्पाना निरोप दिला जातोय. मुंबईसह राज्यभरात बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर..." या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. सण उत्सवांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे कार्य होते. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसांडून वाहतोय, असे सांगत आगामी सण-उत्सव देखील निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे व्हावेत, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. 


कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला. गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जमलेल्या भाविकांच्या जनसागराला अभिवादन करण्यासाठी रात्री पावणे आठच्या सुमारास राज्यपालांसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.






याठिकाणी मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या मंडपातून राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश मिरवणुकींवर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. चौपाटीवर उभारण्यात आलेल्या मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सातत्याने सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चौपाटीवर उभारण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमास देखील त्यांनी भेट दिली.


31 ऑगस्ट रोजी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. त्याआधी पंधरा दिवसांपासून उत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली होती. सजावटीच्या साहित्याच्या असंख्य प्रकारांनी बाजारपेठा सजल्या. गल्ली बोळात, गणराच्या रेखीव आणि लोभस मूर्तींचे स्टॉल आले आणि उत्सवाची उत्कंठा वाढत गेली. 31 ऑगस्ट रोजी गणपती बप्पा मोरया! या जल्लोषात, नव्या उत्साहात गणेशभक्तांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता, बाप्पाचे घराघरात, मंडळांमध्ये वाजतगाजत आमगन झाले. त्यानंतर दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावाने पूजा करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात भाविकांनी गणपतीची मूर्ती, देखावे बघण्यासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी सुरू असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, स्तोत्रपठण, गणेशवंदना, पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुका, धार्मिक कार्यक्रमांमुळे दहा दिवस वातावरण गणेशमय झाले होते. बघता बघता आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आला. जड अंतकरणाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त रस्त्यावर उतरले आहेत.  पुढच्या वर्षीदेखील 'पुन्हा नवचैतन्य घेऊन, या,' असे आवाहन करीत भाविक बाप्पाला निरोप देणार आहेत.