मुंबई : राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईमध्ये 15,500 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्यातील इतर भागातही कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच गणेश विसर्जनाचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. 


मुंबईत एसआरपीएफ आणि 15,500 पोलीस तैनात


मुंबईत गणेश विसर्जनासाठी साडे पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात असणार आहेत.  रॅपिड अॅक्शन फोर्सची टीम तसेच फोर्स वनची विशेष टीम सुद्धा तैनात असणार आहेत. 600  पोलीस महिला अधिकारी कर्मचारी हे साध्या वेशात मुंबईच्या महत्त्वाच्या विसर्जन स्थळाच्या ठिकाणी तैनात असणार आहेत, तर मुंबईतील 77 महत्त्वाचे विसर्जन स्थळ आणि कृत्रिम तलाव येथे विशेष पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहेत. क्राईम ब्रान्च आणि एटीएस अधिकारी सुद्धा विसर्जनाच्या दिवशी विशेष बंदोबस्तावर आहेत. 


नागपुरात यंत्रणा सज्ज 


नागपुरात गणरायाला विसर्जनाच्या दृष्टीने प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. शहरातल्या फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, शुक्रवारी अशा विविध तलावात विसर्जनाला मनाई आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेने ठिकठिकाणी 390 कृत्रिम तलाव (टॅंक) कुंड विसर्जनासाठी तयार केले आहे. चार फूट पर्यंतच्या बाप्पाचे मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करता येणार आहे. तर चार फुटांपेक्षा मोठ्या मूर्तीचे विसर्जन यंदा कोराडी येथे केले जाणार आहे. त्यासाठी कोराडी तलावात खास व्यवस्था करण्यात आल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. नागपुरात साधारणपणे साडेनऊशे सार्वजनिक गणेश मंडळ असून सुमारे साडेसहाशे गणेश मंडळाची गणेश मूर्ती चार फुटांपेक्षा उंच आहे. या सर्वांना उद्या आणि परवा चे दिवस विसर्जनासाठी आ दिले असून बहुतांशी मंडळांचे गणपती उद्याच विसर्जित केले जातील अशी माहिती ही आयुक्तांनी दिली.. मिरवणूक दरम्यान सुरक्षा व्यवस्था कायम राहावी यासाठी नागपूर पोलिसांनी तब्बल 4 हजार पोलीस कर्मचारी तैनात केले आहे.. नागपूर शहराच्या विविध भागापासून कोराडी तलावाचे अंतर सुमारे 20 ते 25 किमी आहे... त्यामुळे कोराडी येथे विसर्जनासाठी जाणाऱ्या प्रत्येक मंडळाला त्याच्या परिसरापासून काही अंतरापर्यंत ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीच्या स्वरूपात जाता येईल.. मात्र पुढे त्यांना गाडीवर बसूनच गतीने कोराडी पर्यंत अंतर पूर्ण करावा लागणार आहे


पुण्यात पाच हजार पोलीस तैनात


गणेश विसर्जनसाठी पुणे पोलिसांची तयारी पूर्ण झाली असून शहरात 5 हजार पोलीस तैनात असणार आहेत. यंदा तीन हजार सार्वजनिक गणेश मंडळाच विसर्जन होण्याचां अंदाज आहे. पुण्यात 85 ठिकाणी घाटावर गणपती विसर्जन होणार आहे. आज रात्री पासून हा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपवण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यावर मुख्य विसर्जन मिरवणूक असणार आहे. तर उद्या पुण्यातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद असणार आहेत. 


सोलापूर आयुक्तांचे मंडळांना आवाहन 


सोलापूर शहरामध्ये सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या गणपती घाट आणि धर्मवीर संभाजी महाराज तलाव येथे पालिकेच्या वतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. गणपती घाट येथे कुंडाची खोली आहे. मात्र या ठिकाणी छोट्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. एकाच वेळी अनेक मूर्तीचे विसर्जन झाल्यास एकावर एक मूर्ती राहतील. पुन्हा मूर्ती वर येण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टींचा विचार करता मोठ्या मूर्ती असलेल्या मंडळानी प्रशासनाला खाणींमध्ये विसर्जन करण्यास सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.


कोल्हापुरात 200 सीसीटीव्हींचा वॉच 


गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर पोलीस सज्ज झाले असून सुमारे तीन हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याचसोबत विसर्जन मार्गावर 200 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मिरवणुकीत जाणीवपूर्वक अडथळा, वाद निर्माण करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या मंडळांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जाईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकेही तैनात करणार आहेत. मिरवणूक मार्गावर खबरदारीचा भाग म्हणून जनरेटर आणि रुग्णवाहिकेचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गणेश मिरवणूक उत्साहात आणि शांततेत व्हावी, यासाठी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तसेच पोलिस मित्र व स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवकांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.


नाशिकमध्ये विसर्जन मार्गावर नो एन्ट्री 


नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गासह नाशिकरोड, गंगापूर  सातपुर, सिडको या भागातील विसर्जन स्थळांजवळील वाहतूक मार्गात सुद्धा बदल करण्यात आले आहेत. यासह नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंगच्या बसेसचाही मार्ग बदलवण्यात आला आहे. यंदा प्रथमच मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार असून यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच मिरवणूक मार्गासह उपनगरीय भागातील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बंदोबस्तांची आखणी करण्यात आली असून मिरवणूक मार्ग लगत कोठेही कोणीही हातगाडी, सायकल मोटरसायकल किंवा कुठलेही वाहने उभे करणार नाही. या मार्गावर केवळ मिरवणुकीत सहभागी मंडळांच्याच वाहनांना प्रवेश असणार आहे. 


औरंगाबादमध्ये प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद  


गणेश विसर्जन मिरवणुका सुलभ होण्यासाठी औरंगाबाद शहरातील दैनंदिन वाहतुकीत पोलिसांनी बदल केला आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी दैनंदिन वाहतूक काही मार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. सकाळी 7 ते रात्री गणेश विसर्जनापर्यंत वाहतुकीत केलेले बदल कायम असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 


उस्मानाबादमध्ये तयारी पूर्ण


उस्मानाबादमध्ये गणेश विसर्जनाची तयारी झाली आहे. विसर्जन विहीर आणि हातलाई तलाव परिसर स्वच्छ करून त्या भोवती बॅरॅकेट्स लाईटची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नगरपालिका यांच्याकडून दक्षता घेण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडूनही शहरातून पथसंचलन करून 180 लोकांचा बंदोबस्त या परिसरात लावण्यात आला आहे.