Ganesh Visarjan : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे.
Ganesh Visarjan 2021 : गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी
आज गणेशोत्सवाची सांगता करत गणपती मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते. चतुर्थीला घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होऊन पूजन केले जाते. पुढील 1 दिवस गणेशाचे यथासांग मनोभावे पूजन केले जाते. यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती मूर्तींचे योग्य मुहुर्तावर विसर्जन केले जाते.
आज 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन केले जाईल. काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, तर काही ठिकाणी सात दिवस गणपती पूजन केले जाते. तर, अनेक ठिकाणी संपूर्ण 10 दिवस गणपतीची सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.
गणपती विसर्जन समुद्र, नदी, तलाव, कुंडामध्ये केले जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाही विसर्जन मिरवणुकीला गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन शक्य असल्यास घरच्या घरी गणपती मूर्तीचे विसर्जन करावे, असंही प्रशासनानं सांगितलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनाही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
अनंत चतुर्दशी तिथी प्रारंभ : 19 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 5 वाजून 59 मिनिटे
अनंत चतुर्दशी तिथी समाप्ती : 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 5 वाजून 28 मिनिटे.
गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत होणार नाही. यासाठी गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पुण्यात देखील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका नाहीत. तर विसर्जनाच्या पार्श्वभूमिवर बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे.