मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्ताने लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी लोटली आहे. मात्र
राज्यभरात काही ठिकाणी विसर्जन सोहळ्याला गालबोट लागलं आहे. दिवसभरात विसर्जनावेळी झालेल्या अपघातांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पुणे - वडकी येथील गायधरा तलावात दोन मुलं गणपती विसर्जनावेळी बुडाली होती. रोहित संतोष जगताप व ओमकार संतोष जगताप अशी या दोन भावंडांची नावं असून त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. हा तलाव वडकी परिसरातील आहे.
आळंदीच्या हद्दीतील खेडमध्ये घरगुती गणपती विसर्जन करण्यास गेलेला 18 वर्षीय तरुण इंद्रायणी नदीत बुडाला. अक्षय अनिल वरपे असं त्याचं नाव आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. NDRF चे जवान तरुणाचा शोध घेत आहेत.
औरंगाबाद - बिडकीनजवळच शिवनाई तलावात गणपती विसर्जन करताना तीन तरुण बुडाले. आदर्श किर्तीशाई, सागर तेलभाते, राजेश गायकवाड यांचा मृत्यू झाला असून तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. गोदावरी नदीपात्रात तरुण बुडाल्याची माहिती आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी दौलताबाद तलावात बुडून आकाश साठेचा या 14 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. औरंगाबादेत तीन घटनांमध्ये पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
नाशिक - गणपती विसर्जनावेळी आई-वडिलांसोबत गेलेल्या किशोर सोनार या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दारणा नदीपात्रात बाप्पासोबत सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये बुडालेला तरुण
गणपती विसर्जनादरम्यान नाशकातील मुंगसरे गावाजवळील डबक्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. दोघा
मित्रांसोबत घरच्या गणपतीचं विसर्जन करायला गेला असता गणेश मराळे हा 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
पिंपरी - जगताप डेअरी जवळ कस्पटे वस्ती येथे दोन मुलं बुडाली. औंध अग्निशमन केंद्रातील जवानांनी एक मृतदेह पाण्याबाहेर काढला असून दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.
बीड - गणपती विसर्जनावेळी नदीपात्रात बुडून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. बीडमधील माजलगाव तालुक्यातील उमरीच्या सरस्वती नदीपात्रात गणेश विसर्जन करताना पांडुरंग महादेव घायतिडकचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
जळगाव - गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सागर धनगर आणि योगेश धनगर या दोन तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीमध्ये ही घटना घडली.