Ganesh Visarjan 2022 : पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात वाजत-गाजत आज राज्यभरात लाडक्या 'बाप्पा'ला निरोप देण्यात येत आहे. दहा दिवस दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज सर्वत्रच बाप्पाना निरोप दिला जातोय. मुंबईसह राज्यभरात बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला आहे. ढोलताशांचा गजर. त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त. गुलालांची उधळण. बाप्पावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी. मुंबईच्या लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत दिसणारं हे दृश्य दोन वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळत आहे. बाप्पांचा जयघोष करत गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळीच सुरु झालीय. तर लालबागचा राजाची मिरवणूक गिरगावच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. 


अनंत चतुर्दशी म्हणजेच विसर्जनासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केलीय. मुंबईत गिरगाव, जुहू चौपाटी या प्रमुख विसर्जन स्थळांसह कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत.  लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत आदेश बांदेकर यांनी  नाचण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसले. लालबागच्या राजा मंडळाची धुरा वाहणारे सुधीर साळवीही त्यांच्याबरोबर दिसले. बोरीवली पूर्व इथल्या मागाठाणे परिसरात विराजमान झालेल्या 'उपनगरचा राजा'ची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. गुलाल उधळत..ढोल ताश्याच्या गजरात उपनगराच्या राजाला निरोप दिला जातोय..दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे.


31 ऑगस्ट रोजी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. त्याआधी पंधरा दिवसांपासून उत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली होती. सजावटीच्या साहित्याच्या असंख्य प्रकारांनी बाजारपेठा सजल्या. गल्ली बोळात, गणराच्या रेखीव आणि लोभस मूर्तींचे स्टॉल आले आणि उत्सवाची उत्कंठा वाढत गेली. 31 ऑगस्ट रोजी गणपती बप्पा मोरया! या जल्लोषात, नव्या उत्साहात गणेशभक्तांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता, बाप्पाचे घराघरात, मंडळांमध्ये वाजतगाजत आमगन झाले. त्यानंतर दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावाने पूजा करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात भाविकांनी गणपतीची मूर्ती, देखावे बघण्यासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी सुरू असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, स्तोत्रपठण, गणेशवंदना, पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुका, धार्मिक कार्यक्रमांमुळे दहा दिवस वातावरण गणेशमय झाले होते. बघता बघता आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आला. जड अंतकरणाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त रस्त्यावर उतरले आहेत.  पुढच्या वर्षीदेखील 'पुन्हा नवचैतन्य घेऊन, या,' असे आवाहन करीत भाविक बाप्पाला निरोप देणार आहेत.


मुंबईत वाहतूक कोंडी -
गिरगाव चौपाटी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत. गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.  वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी घोषणा देत आहेत. गिरगाव चौपाटीप्रमाणे मुंबईतही इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. 


गणपती विसर्जनासाठी तब्बल साडे आठशे किलोमीटरचा प्रवास


वेगळ्या विदर्भाची मागणी करत नागपुरातील देशपांडे ले आउट येथील नागरिक दरवर्षी गणपती विसर्जनासाठी मुंबईला जातात. यंदाही भाविक गुरुवारी दुरंतो एक्सप्रेसने गणपती बाप्पाची मूर्ती  घेऊन विसर्जनासाठी मुंबईला रवाना झाले होते त्यानंतर शुक्रवारी दुपारी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत नागपूरच्या देशपांडे ले आउट मधील नागरिक गणपतीची स्थापना करतात... गेल्या 13वर्षांपासून स्थापन करीत असलेल्या या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे या गणपती मूर्तीचे विसर्जन चक्क मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर करण्यात येते... यासाठी दरवर्षी हे गणेश भक्त बाप्पाची मूर्ती रेल्वेने घेऊन मुंबईला जातात... गेले दहा दिवस बाप्पाची आराधना केल्यावर हे विदर्भवादी गुरुवारी रात्री दुरांतो एक्स्प्रेसने मुंबईला रवाना झाले होते... त्यानंतर शुक्रवारी दुपारी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले... अशा प्रकारे बाप्पाच्या विसर्जनासाठी तब्बल साडे आठशे किलोमीटरचा प्रवास करण्यात आला...  जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणार नाही तोपर्यंत गणपती बाप्पाचे मुंबईलाच विसर्जन करण्यात येणार असं या गणेशभक्तांची म्हणणे आहे.