राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2016 02:09 AM (IST)
मुंबई : अवघ्या जगाचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं मोठ्या भक्तीभावाने आज आगमन होत आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागताची घराघरात आणि मंडळांमध्ये तयारी पूर्ण झाली असून आज ते विराजमान होतील. गणेश मूर्ती घरी आणि मंडळांमध्ये आणण्यासासाठी लोकांची धावपळ पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया.. म्हणत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत लाडक्या गणरायाचं स्वागत केलं जात आहे. मोठ्या भक्तीमय वातावरणात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मुंबईतील सिद्धीविनायक गणपतीची पहाटे पाच वाजता आरती करण्यात आली. यावेळी हजारो मुंबईकरांनी मंदिरात हजेरी लावली आणि बाप्पांचं दर्शनही घेतलं. याशिवाय गणेशगल्ली राजा अर्थात मुंबईचा राजाच्या पहिल्या आरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बाप्पाच्या आगमनाने पुढील दहा दिवस राज्यभरातील वातावरण भक्तीमय असेल. घराघरात आरत्यांचे आणि टाळ-मृदुंगाचे सूर ऐकू येतील. या गणेशोत्सवाची बित्तंबातमी 'एबीपी माझा' तुमच्यापर्यंत पोहोचवत राहाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मुंबईत जवळपास 19 हजार पोलिस पहाऱ्यावर असून गर्दीच्या ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून गाड्यांची तपासणीही करण्यात येत आहे. आज दिवसभर होणाऱ्या आगमनाच्या मिरवणुकीसाठी ट्रॅफिक पोलिसांनाही योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.