रत्नागिरी: लोकमान्य टिळकांचं जन्मस्थळ असलेल्या टिळक आळीमध्ये प्रतिष्ठापित होणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सवाची मिरवणूक काल रात्री जल्लोषात निघाली. रत्नागिरीच्या लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळ असलेल्या टिळक आळी येथे या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते.

लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण गणेशोत्सवाचे आयोजन होते. यामुळे या गणपतीची मिरवणूक ही अत्यंत पारंपरिक पद्धतीने काढली जाते.

शेकडो तरुण- तरुणी लेझीमच्या ठेक्यावर ताल धरत या मिरवणूक सोहळ्यात सहभागी होतात. तरुण तरुणीच्या लेझीम बरोबरच या मिरवणुकीत भजने गायली जातात. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि जल्लोषात रत्नागिरीच्या या टिळक आळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाप्पांचे आगामन होते.

कोकणात गणेशोत्सवाची धूम

कोकणातील गावागावात कालपासूनच गणेशाच्या आगमनाला सुरुवात झाली. ग्रामस्थ चित्रशाळेतून आपल्या गणेशाच्या मूर्ती घरांकडे घेऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकणात आजही बहुतांश गावात पारंपरिक पद्धतीने डोक्यावरुन गणेश मूर्तीचे आगमन होते. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जात आहेत. पुढील दहा दिवस संपूर्ण कोकणात भारावलेले वातावरण असेल. कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांसह कोकणी माणूस आपला वर्षभरातील सगळ्यात मोठा उत्सव जल्लोषात साजरा करतो.

वेगळा बाजार

कोकणातील गणेशोत्सव आपलं एक वेगेळेपण जपत असतो. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीपासून सिंधुदुर्गात मात्र एक अनोखा बाजार  अनुभवायला मिळतो. वेंगुर्ला शहरातील हा बाजार अनोखा ठरतो, कारण सायंकाळी काळोख पडू लागला की हा बाजार  सजू लागतो. हा बाजार  असतो जंगली रानफुलं आणि फळांचा. कोकणच्या जंगलात सापडणारी वेगवेगळ्या रंगाची पानं-फुलं आणि फळं  बाजारात विक्रीसाठी आणली जातात. विविध रंगाच्या फळांनी पानांनी हा सगळं बाजार सजतो. हा बाजार पूर्ण रात्रभर चालतो. रात्रभर लोक या बाजारातही फळं फुलं पानं खरेदी करायला गर्दी करतात.

सायंकाळी उशिरा सुरु झालेला हा वेंगुर्ल्याचा अनोखा बाजार दुसऱ्या दिवशी दुपारी बारावाजेपर्यंत चालतो. नागरिक रात्री बाजारात येऊन ही फळं फुलं नेतात आणि यातूनच गणेशाची आरास केला केली जाते. सिंधुदुर्गात गणेशाच्या मूर्तीवर लाकडाची माटी बांधली जाते. आणि ही माटी या जंगली पानं फुलं आणि फळांनी सजवली जाते.  गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला भरणारा हा रात्रभर चालणार अनोखा बाजार आपलं वेगळेपण जपतो.