कोल्हापूर : बायकोला पळवल्याच्या रागातून आपल्याच पुतण्याची हत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी एकट्याने दोन्ही मारेकऱ्यांना हत्यारांसह जेरबंद केलं.
तीन वर्षांपूर्वी सुनील मगदूमने आपल्याच काकीचे अपहरण केल्याची तक्रार काका भीमराव मगदूम यांनी पोलिसात दाखल केली होती. पण तेव्हापासून सुनील खटल्याला हजर राहण्यास टाळाटाळ करत होता. पण आज अटकेची टांगती तलवार असल्याने तो गडहिंग्लजच्या कोर्टात आला.
कोर्टातून बाहेर पडताना भीमराव मगदूम आणि मुलगा रोहित मगदूम यांनी सुनीलच्या मोटरसायकलची पेट्रोलची पाईप काढून ठेवली. काही अंतर गेल्यानंतर सुनीलची बाईक बंद पडल्याचे हेरुन सुनीलवर हल्ला चढवला.
आधी रोहितने सुनीलच्या डोळ्यात चटणीपूड फेकली. त्यानंतर रोहितने केलेले जांबियाचे वार सुनीलने चुकवले. पण भीमरावने केलेल्या कुऱ्हाडीचे घाव सुनीलच्या वर्मी बसले. हा सगळा प्रकार भरदुपारी गावाच्या बसस्थानकासमोरच्या चौकात सुरु होता. त्यावेळी पळापळ झाली, पण जेव्हा सुनील रक्ताच्या थारोळ्यात जीवाच्या आकांताने तडफडत होता, तेव्हा कुणीही पुढे आले नाही.
तितक्यात हल्ल्याचा गोंगाट ऐकून जवळच राहत असलेले पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील धावून आले. त्यांनी हाती शस्त्र नसतानाही दोन्ही मारेकऱ्यांना हत्यारांसह जेरबंद केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान जखमी सुनीलला उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.