गडचिरोली: जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली असून पुराचा पाणी शहरात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक घरे पाण्याखाली आले आहेत. मध्यरात्री 3 वाजेच्या दरम्यान पुराचा पाणी शहरात शिरायला सुरुवात झाल्याने प्रशासन आणि नागरिकांची धावपळ उडाली. पाण्याखाली आलेल्या अनेक घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून संपूर्ण शहराला सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केलं आहे.

तर आता पोलीस व महसूल प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली आहे. शहरात वेगाने पुराचं पाणी शिरत असल्याने अनेक लोक घरात अडकून असल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटच्या सहाय्याने भामरागड एसडीपीओ, तहसीलदार आणि नगरपंचायतचे मुख्य कार्यपालन अधिकारी या रेस्क्यू ऑपरेशनसाठी स्वत: फिरत आहेत.

यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पर्लकोटा नदीला पूर आला आहे. मागील वर्षी पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड शहर 70 टक्के पाण्याखाली आलं होतं. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीला आलेल्या महापूरानंतर गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडला आलेला पुराने विशेष लक्ष वेधले होते. जिल्हा प्रशासनाने मागील वर्षी आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विशेष खबरदारी घेतली आहे.



महसूल विभागाने विशेष रणनीती तयार केली आहे. अतिरिक्त रेस्क्यू बोट्स मागवल्या आहेत तर रेस्क्यू केलेल्या लोकांना राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा संपूर्ण भाग घनदाट जंगल आणि दुर्गम असल्याने दूरध्वनी सेवा नेहमी खंडित होत असते. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थिती कुठेही अडथळा निर्माण होऊ नये या कारणाने विशेष सॅटलाईट मोबाईल महसूल विभागाकडे देण्यात आले आहे.



त्यामुळे संपूर्ण जिल्हात प्रशानाच्या योग्य नियोजन केले असून कुठल्याही परिस्थितीत सामोर जाण्यास टीम तयार आहे. दक्षिण गडचिरोली भागात पाऊसाचा जोर अधिक असल्याने याचा फटका अनेक दुर्गम भागातील गावांना व मुख्य मार्गाना बसला आहे. अनेक पुलांवरुन पुराचं पाणी जात असल्याने मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाली आहे. दोन दिवसांपासून छत्तीसगड राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 63वाहतुकीसाठी बंद आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावात जाणाऱ्या मार्गावरील नाल्यांवर पूल नसल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत.