गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपुरातील 13 हत्ती आणि पिलांना गुजरातमधील जामनगर इथे हलवण्याबाबत अखेर निश्चिती झाली आहे. महाराष्ट्राच्या वनबल प्रमुख युवराज एस यांनी आजच या संदर्भात एक आदेश जारी केला आहे. वनविभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या हत्तींचं यापुढील आयुष्य सुकर व्हावं यासाठी त्यांना प्रशस्त जागा असलेल्या गुजरातमधील जामनगर स्थित राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येत असल्याचं आदेशात म्हटलं आहे. 


गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर-पातानील आणि चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वयोवृद्ध, अप्रशिक्षित हत्ती आणि पिलांना गुजरातमधील राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपवलं जाणार आहे. यामध्ये कमलापूर इथले आठपैकी चार सुदृढ हत्ती तर पातानील, ताडोबा या ठिकाणच्या अशा एकूण 13 वयोवृद्ध हत्ती आणि पिलांचा समावेश आहे.




टेम्पल ट्रस्ट या सर्व हत्तींची कुठलाही खर्च न घेता आजन्म देखरेख करणार आहे. यासाठी टेम्पल ट्रस्ट नवीन सुविधा निर्माण करणार आहे. पत्रात या 13 हत्तींना पुढील जीवनकाळातील योग्य आरोग्य आणि उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळावी, प्रशिक्षित आणि अनुभवी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार मिळावे यासह आधुनिक सुविधा देण्यासाठी हे केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. टेम्पल ट्रस्ट या सर्व हत्तींना यापुढे कुठलंही काम देणार नसून त्यांचा धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा वापर आणि प्राणिसंग्रहालयाप्रमाणे कुठेही प्रदर्शनासाठी वापर करणार नाही, हे पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. 


काही महिन्यांपूर्वी हाच प्रस्ताव पुढे आल्यानंतर राज्यभर वन्यजीव अभ्यासक आणि राजकीय नेत्यांनी याविरोधात आवाज बुलंद केला होता. तर महाराष्ट्रातच हत्ती सफारीसारखी सुविधा निर्माण करुन हे हत्ती अन्यत्र हलवले जाणार नाही हे ठामपणे सांगितलं होतं. मात्र आता हे सर्व दावे पोकळ ठरले असून केंद्र शासनाने नाहरकत दिल्यानंतर वनविभागाने हे सर्व हत्ती अनेक अटींसह ट्रस्टला देण्याची निश्चिती केली आहे. त्यामुळे या हत्तींचं गुजरातमध्ये स्थलांतर होणार हे नक्की झालं आहे.