गडचिरोली : गडचिरोलीतल्या मेडदापल्लीतल्या जंगलातली नेहमीची सकाळ.. राजू, सोनी आणि मुल्ला... तिघं तेंदुपत्ता वेचायला गेले होते. पानं वेचतावेचता एकमेकांपासून दूर केले आणि त्याचवेळी राजू आणि मुल्लावर एका अस्वलीणने हल्ला केला.


मुल्लाने या अस्वलीणीच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेतली. पण अस्वलीणीने राजूला मात्र सोडले नाही. आपल्या पतीवर हल्ला होत असल्याचं पाहून सोनीने थेट तिच्यावरच हल्ला केला. पिसाळलेल्या अस्वलीणीने राजूला सोडून सोनीच्या दिशेने आक्रमण केलं.

त्याचवेळी या कुटुंबियांच्या इमानदार कुत्र्याने अस्वलीणीच्या पायाचा लचका तोडला. चिडलेल्या अस्वलीणीनं कुत्र्यालाही ठार मारलं. तितक्यात गावकरी जमा झाले आणि त्यांनी अस्वलीणीला हुसकवून लावलं.

त्यानंतर जे झालं, तेही वेदनादायी होतं.. नवऱ्याचा जीव तर वाचलाच नाही... पण सोनी अजुनही मृत्यूच्या दाढेत आहे.

गडचिरोलीतल्या जंगलामध्ये आजही रुग्णव्यवस्था किती तकलादू आहे याचं हे विषण्ण करणारं उदाहरण. त्यामुळे हिंस्र श्वापदांपेक्षा निर्ढावलेली व्यवस्था जास्त घातक असते, तेच खरं...