पालघर : गडचिंचले प्रकरणातील सीआयडीने अटक केलेल्या 32 नव्या आरोपींपैकी 24 आरोपी गडचिंचले परिसरातील व 8 आरोपी सिल्वासा भागातील असून, या सर्व 32 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. डहाणू न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एम.वी.जावळे यांनी या 32 आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सर्व आरोपींना पालघर सब जेलमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. सीआयडीने याप्रकरणी आणखी 18 आरोपींना ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यांना डहाणू न्यायालयात हजर केले जाणार आहे.


ठाणे येथील विशेष न्यायालयात गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणातील 62 आरोपींच्या जामिनावर अर्जावर आज सुनावणी घेण्यात येणार होती. ठाणे न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी 62 आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारी 3 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. राज्य विशेष वकील सतीश मानेशिंदे यांनी या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीशांनी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


सीआयडीने बुधवारी 16 एप्रिलला या प्रकरणात 208 नवीन आरोपींची नावे दिली होती. यापैकी अटक केलेल्या 32 आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले, तर आणखी 18 आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले असून अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणात एकूण 366 आरोपी असून त्यापैकी 11 अल्पवयीन आहेत. यापैकी 28 आरोपी व 9 अल्पवयीनांची नावे सीआयआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात समाविष्ट नसल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्याचे झाले आहेत.


काय आहे गडचिंचले प्रकरण?


16 एप्रिलला पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागातमार्फत करण्यात आला. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केले आहेत.