बुलडाणा : इंटरनेट ही अनेकांसाठी जीवनावश्यक बाब होत चालली आहे. आजवर रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, टॅक्सी यासारख्या ठिकाणी वायफाय सुविधा असल्याचं ऐकलं असेल, पण बुलडाण्यात चक्क एक चहा विक्रेत्याने आपल्या ग्राहकांसाठी मोफत वायफायची सुविधा सुरु केली आहे.

विशेष म्हणजे चहाच्या टपरी वायफाय सेवा सुरु केल्यापासून त्यांची कमाई दुपटीने वाढली आहे. पंजाबराव देशमुख गेल्या 25 वर्षांपासून संतनगरी शेगावच्या रेल्वे स्थानकावर चहा विक्रीचा व्यवसाय करत आहेत. याच चहाच्या व्यवसायाच्या बळावर त्यांनी आपल्या मुलीला इंजिनिअर केलं आहे.

इंजिनिअर मुलीच्या संकल्पनेतून पंजाबराव देशमुख यांनी आपल्या ग्राहकांसाठी फ्री वायफाय सेवा सुरु केली आहे. संत गजानन महाराज यांच्या पावन नावाने प्रसिद्ध असलेल्या या शेगाव नगरीत जेव्हा भाविक रेल्वे स्थानकामधून पहिलं पाऊल ठेवतात, तेव्हा त्याला प्रथम दिसतं जगप्रसिद्ध शेगाव कचोरी आणि त्याच्याच बाजूला पंजाबराव बाप्पूंचं हायटेक चहा दुकान.

फ्री वायफायच्या या सुविधेमुळे पंजाबरावांच्या चहा विक्रीला जरा वेगळाच जोर चढला आहे, कॉलेजचे विद्यार्थी, युवक, तसेच येणारे जाणारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चहाच्या आस्वादासोबत वायफायची सेवा वापरण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे इंटरनेटने जगाशी
जोडण्याची एक संधीच या चहा विक्रेत्याने आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे.

या चहा दुकानाला भेट देणारा चहाच्या प्रत्येक घोटासोबत मिळणाऱ्या फ्री वायफायमुळे आनंदाने  म्हणत आहेत, 'व्हॉट अॅन आयडिया सरजी'