कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या हत्येचा तपास संथ गतीने सुरु असल्याच्या निषेधार्थ आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात मॉर्निंगवॉक करत निषेध केला. यावेळी मॉर्निंग वॉकला नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता.
 VIDEO | कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या, कार्यकर्त्यांचा मॉर्निंग वॉक करत निषेध | कोल्हापूर | एबीपी माझा



कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या हत्येचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असून याबाबत तपास यंत्रणांना अनेक वेळा न्यायालयाने फटकारले आहे. पानसरे , दाभोलकर या दोन्ही हत्यांचा तपास जलद गतीने व्हावा आणि या हत्येमागचे मास्टरमाईंड शोधावा अशी मागणी या मॉर्निंग वॉक दरम्यान करण्यात आली आहे . यावेळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, उमा पानसरे, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे यांचेसह चळवळीतील अनेक विचारवंत उपस्थित होते.

विवेकाचा आवाज बुलंद करावा, दाभोळकर आणि पानसरे यांची हत्या करणार्‍यांना त्वरित पकडावे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच कर्नाटक सरकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना जर पकडू शकत असेल तर महाराष्ट्र सरकार कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना का पकडू शकत नाही असा सवाल यावेळी सरकारला विचारण्यात आला आहे.

ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने तपास करून खरे मारेकरी समोर आणले. त्याचप्रकारे महाराष्ट्र एसआयटीनेही तपास करून दाभोळकर आणि पानसरे यांच्या मारेकऱ्यांना समोर आणण्याची गरज असल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी म्हटले. तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. पण यामध्ये सुधारणा होण्याची गरज असून देशातील 4 विवेकवाद्यांची हत्या झाली आहे. त्यांना न्याय मिळावा, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीकडून 4 जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ८ आरोपींची एसआयटीकडून चौकशी झाली असून अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे या 4 जणांविरोधात 400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कट रचणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, खून करणे या कलमाखाली हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.