Maharashtra MLC Election : विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार नाही, महायुतीचे सर्व आमदार एकत्र असून शंभर टक्के आमचेच सर्व उमेदवार निवडून येणार असा दावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. यावेळी राजकीय भूकंप झालाच तर तो आम्हीच करू विरोधकांकडून तो होऊ शकत नाही, असं देखील दानवे यांनी म्हटलं आहे. 


विरोधकांना आरक्षणाबाबत आस्था नाही


दरम्यान, मराठा आरक्षणाच्या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या विरोधकांना आरक्षणाबाबत आस्था नाही अशी टीका दानवे यांनी केली. फडणवीस यांच्यावर जरांगेंकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य असल्याचं दानवे म्हणाले. 


महायुती आणि मवाकडे एकूण किती आमदार?


महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीकडे सध्या एकूण 200 आमदार आहेत, तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीला स्वबळावर उमेदवार निवडायचा असेल तर आणखी 4 मतांची गरज आहे, तर ठाकरे गटाला उमेदवार निवडायचा असेल तर 8 मतांची गरज आहे. भाजपा आपले चार उमेदवार स्वबळावर निवडून आणू शकतो. जर पाचवा उमेदवार निवडून यायचा असेल तर त्यांच्याकडे स्वतःची 8 मते असणे आवश्यक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पक्षाला आपापली मते गोळा करावी लागणार आहेत.


काँग्रेसच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता किती?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने अद्याप हॉटेल बुक केलेले नाही. सर्व आमदारांना एकत्रित मतदान कसे करायचे हे सांगितले आहे. काँग्रेसकडे एकूण 37 मते असून 23 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर 14 मते शिल्लक आहेत. जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांना ही मते मिळू शकतात. पण, प्रत्येक पक्षाला कमी पडणारी मते गोळा करायची आहेत.


11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक लढवणार


महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. ज्यासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गट, भाजप, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.


लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या वातावरणाचा फायदा कोणाला होणार?


महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा वरचष्मा आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत महायुती भक्कम दिसत आहे. त्यामुळे 11 पैकी 9 जागांवर विजय मिळत असल्याचे दिसत असले तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या वातावरणात शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार पक्ष बदलतील हे नाकारता येणार नाही. तसे झाल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल.


इतर महत्वाच्या बातम्या