नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या प्रणव मुखर्जींच्या स्वागतासाठी काँग्रेसकडून कुणीही उपस्थित नव्हतं. आरएसएसने आपल्या पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं.


आरएसएसचं शिष्टमंडळ नागपूर विमानतळावर प्रणव मुखर्जींच्या स्वागतासाठी दाखल झालं. संघाच्या शैलीत कोणतीही फलकबाजी नकरता, घोषणाबाजी न करता प्रणव मुखर्जींचं स्वागत करण्यात आलं. माध्यमांना दूर ठेवत शिष्टमंडळाने राजभवन गाठलं.

दरम्यान, प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारल्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र आपण सगळ्या मुद्द्यांवर नागपुरातच बोलू, असं म्हणत प्रणव मुखर्जींनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.

नागपुरात आरएसएसच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 7 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.