पिंपरी-चिंचवड : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी शेळकेंना अडवून बंदुकीचा धाकाने गाडीतून खाली उतरवलं. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून गोळ्या झाडल्या. निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्यामुळे तळेगावमध्ये तणावाचे वातावरण आहे.
भाजप नेते सचिन शेळकेंवर वार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. हल्लेखोर कोण आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
सकाळी सव्वाअकराच्या सुमारास खांडगे पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. सकाळी शेळके हे पेट्रोल पंपासमोरून त्यांच्या कारमधून येत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून बंदुकीचा धाक दाखवून गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून गोळ्या झाडल्या.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सचिन शेळके यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, पक्ष प्रतोद आणि नगराध्यक्षपद भुषवलं आहे. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज तळेगाव बंद ठेवण्यात आलं. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेऊन घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तर रविवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी संपूर्ण मावळ बंदचे आवाहन केले आहे.
सचिन शेळके यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.