जळगाव : राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर जैन यांच्या आर. एल. ग्रुप म्हणजेच राजमल लखीचंद या सोने क्षेत्रातील नामांकित कंपनीने स्टेट बँकेकडून घेतलेलं कर्ज मुदतीत न भरल्याने कर्जासाठी तारण ठेवलेल्या विविध मालमत्तांवर स्टेट बँकेने आता प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. त्यामुळे राजमल लखीचंद ग्रुपला या मालमत्ता आता परस्पर विकता येणार नाही. पण या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं जैन यांनी सांगितलं आहे.


जैन यांच्या आर.एल ग्रुपने स्टेट बँकेकडून तारण ठेव योजनेतून 500 कोटीचं कर्ज घेतलं होतं. पण कर्जाची परतफेड वेळेत न केल्याने स्टेट बँकेने 12 जून रोजी कंपनीच्या विविध मालमाता प्रतिकात्मक ताब्यात घेतल्या. याबाबतची माहिती नोटिसीद्वारे दिल्यानंतर जळगावच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

पण बँकेची कारवाईनंतर जैन यांनी स्टेट बँकेची कारवाई नियमबाह्य असल्याचं म्हणलं आहे. कराच्या पैशांची नियमापेक्षा जास्त रक्कम स्टेट बँकेने वसुली केल्याने, बँकेकडून आपलेच घेणे लागते. त्यामुळे बँकेच्या कारवाईबाबत आपण हायकोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

तर दुसरीकडे बँकेकडून प्रतिकात्मक ताबा असल्याने, त्या विषयी आपल्याला कोणतीही तक्रार नाही. याविषयी आपली बँकेशी बोलणी अंतिम टप्प्यात असून यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा जैन यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बँकेने राजमल लखीचंद ग्रुपच्या मालमत्तांवर प्रतिकात्मक ताबा घेतल्याने, त्यांना या मालमत्ता परस्पर विकता येणार नाही आहेत.

कोण आहेत राजमल लखीचंद ज्वेलर्स?

राजमल लखीचंद ज्वेलर्स म्हणजेच आरएल ही जामनेरच्या ईश्वरलाल जैन यांची जळगावात मोठी पेढी आहे. त्यांच्या ठाणे, कोल्हापूर आणि पुण्यातही पेढया आहेत. सोनं खरेदीसाठी महाराष्ट्रातील असंख्य ग्राहक राजमल लखीचंद ज्वेलर्सलाच प्राधान्य देतात. आर एलग्रुपची पेढी महाराष्ट्राच्या सुवर्ण क्षेत्रात अतिशय नावाजलेली कंपनी आहे.