मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस वारंवार चव्हाट्यावर येत आहे. कधी नियुक्त्या, तर कधी बदल्या, तर कधी निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेतल्यामुळे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांकडून नाराजीचा सूर आळवला जात आहे. मात्र असं असलं तरी राज्याच्या राजकारणात ठाकरे - पवार पॅटर्न हा नवा प्रयोग उदयास येत असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-राष्ट्रवादीने मोट बांधल्याचा दावा भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. तसेच काँग्रेस या तोडग्याला तयार होईल असा विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय. एका विश्वसनीय व्यक्तीकडून त्यांना याची माहिती मिळाल्याचं त्यांनी कबूल केलं.


संजय काकडे यांनी याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. काकडेंच्या मते युतीचा हा नवा पॅटर्न भाजपसमोर मोठं आव्हान उभं करू शकतो. त्यामुळे भाजपने वेळीच सतर्क होणं गरजेचं असल्याचा सल्लाही काकडे यांनी भाजपला दिलेला आहे. इतकंच नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 17, राष्ट्रवादी काँग्रेस 16 आणि काँग्रेस 15 असं जागावाटपाचं सूत्र ठरत असल्याची चर्चाही झाल्याचा त्यांनी खुलासा केला.


संजय काकडे यांच्या मते महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधला संभ्रम दूर करणे आणि पक्षांतर करण्याच्या तयारीत असलेल्या काठावरच्या आमदारांना सूचक इशारा देण्यासाठी या नव्या राजकीय समीकरणांची नांदी होऊ घातली आहे. यामुळे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ज्या पक्षांची ताकद आहे त्यांना बळकटी देऊन भाजपचा सफाया करण्याची रणनीती आखली जाण्याची तयारी आहे.


खरंतर संजय काकडे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकला आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार झाले. यंदा 2014 च्या निवडणुकीत काकडे पुन्हा भाजप सोडून घरवापसी करण्याच्या मार्गावर होते. पण देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी निर्णय बदलला. यापूर्वीही संजय काकडे त्यांच्या खळबळजनक दाव्यांसाठी अनेकदा चर्चेत राहिलेत. मात्र त्यांचे सर्वपक्षीय संबंध असल्याने ते कायम अशी वक्तव्य करत असतात.


दरम्यान, मध्यप्रदेश आणि राजस्थाननंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चा असल्या तरी हे सरकार पडणार नाही असं भाकीत संजय काकडे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे संयमी नेतृत्व असल्याने सरकार टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


Maha vikas Aghadi | थोडी काळजी घेतली तर महाविकास आघाडी भक्कम होईल : बाळासाहेब थोरात