चंद्रपूर : राज्याचे माजी पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचं निधन झालं आहे. कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित निघाल्यावर देवतळे यांनी चाचणी केली होती. त्यावेळी त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांच्यावर गेले 6 दिवस नागपूरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनातून त्यांची तब्येत बऱ्यापैकी सावरली होती मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.


2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर वरोरा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.  नुकतेच केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. 


देवतळे हे 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. 2009 ते 2014 या काळात जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह राज्याच्या पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्रीपदाचा भार सांभाळला होता. अजातशत्रू, मितभाषी, निष्कलंक, ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क असलेला आणि सर्वांना सोबत घेवून चालणारा नेता अशी त्यांची ओळख होती.