सांगली : निवडणुकीत उमेदवार म्हणून पात्र ठरण्यासाठी कोण काय करेल? हे सांगता येत नाही. कारण, ग्रामपंचायत निवडणुकीत पात्र होण्यासाठी एका उमेदवाराने चक्क भाड्यानं शौचालय घेतल्याचा प्रकार सांगली जिल्ह्यातून समोर आला आहे.


'हगणदारी मुक्त गावा'साठी सरकारनं शंख करुन जनजागृती केली. पण लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही हेच खरं. कारण, आटपाडी तालुक्यातल्या लिंगिवरे गावात सरपंचपदाच्या निवडणुकीत पात्र होण्यासाठी आत्माराम खटके या उमेदवाराने चक्क शौचालयचा दाखला भाड्यानं घेऊन सादर केल्याचं समोर येत आहे.

याची शहानिशा करण्यासाठी एबीपी माझाची टीम खटकेंच्या मूळ घरी गेली. तेव्हा ते घर मात्र पूर्णपणे कोसळलेलं दिसलं. पण ऐन निवडणुका येताच भाड्याचं घर घेऊन करार करण्याची घाई का केली?  असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर, याची तक्रार प्रशासनासमोर गेली. मात्र, प्रशासनाने ती फेटाळली. त्यामुळे एखाद्याने निवडणुकीआधी शौचालय भाड्याने घेऊन कागदोपत्री दाखवले तर चालेल का? याचं उत्तर आता प्रशासनाला द्यावे लागणार आहे. अन्यथा हगणदारीमुक्तीची योजना फक्त कागदांवरच दिसेल हे मात्र नक्की.