35 शेतकऱ्यांनी सात बारा दिले, 1 टक्का सुद्धा शेतकऱ्यांचे समर्थन नाही, कांगावा करणाऱ्या फडणवीसांचा ढोंगीपणा समोर; राजू शेट्टींचा सडकून प्रहार
राजेश क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिले दाखवून 86 लाख रूपयाची शासनाची फसवणूक केली तेच आता शक्तीपीठला बोगस शेतकरी दाखवून 50 हजार कोटीच्या ढपल्यात हिस्सा घेण्यासाठी खटाटोप करत असल्याचा हल्लाबोल केला.
Raju Shetti on Devendra Fadnavis: कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गास संमती दिली असल्याचा कांगावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, यामध्ये त्यांचा ढोंगीपणा समोर आला आहे. मुंबईत दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील 35 शेतकऱ्यांनीच सात बारा दिले असून 1 टक्काही लोकांचे शक्तीपीठ महामार्गास समर्थन नसल्याचे दिसून आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघचनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. दोन दिवसंपूर्वी झालेल्या बैठकीत माणगाव गावातील 6 लोक घेऊन गेले होते. मात्र त्यातील 3 लोकांचीच जमीन संपादित केली जाणार आहे, उर्वरीत तीन लोक भुजगावणे म्हणूनच घेऊन गेले होते, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला.
1 टक्काही लोकांचे या महामार्गास संमती नसल्याचे स्पष्ट
दोन दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत बैठकीत घेतली. या बैठकीत 35 लोकांनी सात बारा शासनाकडे जमीन संपादनास दिले असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 3822 गटधारकांची जवळपास 5300 एकर संपादित केली जाणार असून या गटामध्ये 10 हजारहून अधिक शेतकरी समाविष्ट आहेत. यामुळे गटधारकांच्या 1 टक्काही लोकांचे या महामार्गास संमती नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. यामुळे राज्य सरकार शक्तीपीठ समर्थनासाठी जो खटाटोप करत आहे त्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. ज्यापध्दतीने कोल्हापूरची करवीर निवासनी अंबाबाई देवीने कोल्हासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आता कोल्हापुर शहरातील जनतेला पुराच्या खाईत लोटणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग रूपी राक्षसापासून कोल्हापूरच्या जनतेचे रक्षण आई अंबाबाईच करेल.
ट्रेंडिंग
मोबदल्यासाठी कोणताही निर्णय स्पष्ट झालेला नाही
काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गेल्या अधिवेशनात समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागितली गत आठवड्यात याबाबत लेखी पत्र सुध्दा दिले. मात्र, माहिती त्यांना ती आज अखेर देण्यात आली नाही. जमीनीच्या मोबदल्यासंदर्भात राज्य सरकारचा कोणताही निर्णय स्पष्ट झालेला नाही. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री कोणतीही गोष्ट रेटून व लादून करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिले दाखवून 86 लाख रूपयाची शासनाची फसवणूक केली तेच राजेश क्षीरसागर आता शक्तीपीठ महामार्गात बोगस शेतकरी दाखवून 50 हजार कोटीत ढपल्यामध्ये हिस्सा घेण्यासाठी खटाटोप करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गामुळे महापूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन विभागातील इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये होणारी पर्यावरणाची हानी, क्षारपड जमिनीची समस्या, शहरी व ग्रामीण भागातील वाढीव पुरबाधित भागातील गोरगरीब लोकांचे होणारे नुकसान, महामार्गाच्या दोन्ही बाजूस संरक्षित भिंत असल्याने गावाचे, शेतीचे व वाड्यावस्तीचे होणारे विभाजन, उस उत्पादनात घट झाल्याने भविष्यात साखर कारखानदारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याबाबत मुख्यमंत्र्यांनी भ्र शब्द काढण्यास तयार नसल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या