Eknath Khadse on Girish Mahajan : राज्याचे जलसंपदा मंत्री, भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. नुकतेच गिरीश महाजन यांनी कोण एकनाथ खडसे? असे वक्तव्य केले होते. आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी खोचक टोला लगावला आहे.
गिरीश महाजनांना एकनाथ खडसेंना खोचक टोला
एकनाथ खडसे म्हणाले की, गिरीश महाजन हे एक अत्यंत महान व्यक्तिमत्व आहे. सुसंस्कृत आहे, जगविख्यात आहे आणि मी एक लहान माणूस आहे. त्यामुळे मला फारसे लोक महाराष्ट्रात ओळखत नाहीत. स्वाभाविकता त्यांनी हे म्हटले असेल, त्यामुळे अशा महान व्यक्ती ज्या वेळेस बोलतात त्यांच्या बोलण्याला फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नसते, असा खोचक टोला त्यांनी गिरीश महाजन यांना लागवलाय.
जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला नाही
दरम्यान, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा या क्षणापर्यंत दिलेला नाही, अशी माझी माहिती आहे. या सगळ्या अफवा आहेत. त्यामुळे त्याला फारसा काही अर्थ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
खान्देशला नवीन संसद सदस्य मिळाला
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची आज राज्यसभेवर निवड झाली. याबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड झाली, याचा मला आनंद आहे. खान्देशला एक नवीन संसद सदस्य, नवीन खासदार मिळालेला आहे. त्यांच्या माध्यमातून खान्देशच्या विकासाला गती येईल, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
संजय शिरसाटांनी राजीनामा द्यावा
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूममध्ये पैशांनी भरलेल्या बॅगचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, संजय शिरसाट यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या संदर्भात शासनाने चौकशी केली पाहिजे. चौकशीचे जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडले पाहिजे. मंत्र्यांच्या संदर्भात नुसते आरोप झाले तरीही राजीनामा देणारे मी पाहिले आहेत. या प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आणखी वाचा
समृध्दी, शक्तिपीठ काढा पण आदिवासींना काहीतरी द्या, विधान परिषदेत एकनाथ खडसेंची फटकेबाजी
