Edible Oil : अन्न सुरक्षा व मानदे नियमन 2011 आणि मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी खाद्यतेलाच्या (Edible Oil) संदर्भात नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. खाद्यतेलाच्या पुर्नवापरासाठी प्राप्त झालेल्या आदेशानुसार नियमांचे पालन करणं आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शि.स. देसाई यांनी दिली आहे. विविध नियम आणि आदेशात नमूद केल्याप्रमाणे तळलेल्या खाद्यतेलाचा पुर्नवापर टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.


नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार कारवाई होणार 


तळलेल्या खाद्यतेलाचा पुर्नवापर करताना ट्रान्सफॅट तयार होणे टाळण्यासाठी जास्तीत जास्त तीन वेळेस वापर करावा. न वापरलेल्या तेलामध्ये 15 टक्क्यांपेक्षा जास्त टोटल पोलर कंपाऊंड्स (टीपीसी) आढळता कामा नये. 25 टक्क्यांपेक्षा जास्त टीपीसी आढळून आल्यास त्याचा पुर्नवापर करु नये असी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागानं दिली आहे. 50 लिटरपेक्षा जास्त खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी खाद्यतेलाच्या पुर्नवापराबाबतचा (आरयुसीओ) अभिलेखा जतन करावा. तसेच उपयोगात आलेले खाद्यतेल अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली मान्यता प्राप्त संस्थेकडे देण्यात यावे व त्याबाबतचा अभिलेखा जतन करावा अशी तरतूद आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम 55, 57 व 58 आणि भा.द.वि. कलम 272 व 273 नुसार कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही अन्न व औषध प्रशासन विभागानं दिली आहे.


अखाद्य तेलाचा वापर बायोडिझेल, साबण, वंगण आदींचे उत्पादन करण्यासाठी करावा 


उपयोगात आलेले अखाद्य तेल जमा करणाऱ्या मान्यता प्राप्त संस्था किंवा प्रतिनिधींनी हे तेल बायोडिझेल, साबण, वंगण आदींचे उत्पादन करण्यासाठी वापर करावे. कोणत्याही परिस्थितीत याचा वापर खाद्यपदार्थ निर्मिती किंवा भेसळीकरीता करु नये असेही अन्न व औषध प्रशासन विभागानं सांगितले आहे. तसेच याबाबतचा आवश्यक तो अभिलेखा जतन करावा. या प्रकरणी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम 57 आणि भा.द.वि. कलम 272 व 273 नुसार कडक कारवाई करण्यात येईल.


पुनर्वापर केलेले खाद्यतेल आरोग्यास तसेच पर्यावरणास हानीकारक 


पुनर्वापर केलेले खाद्यतेल आरोग्यास तसेच पर्यावरणास हानीकारक असते. अशा खाद्यतेलामध्ये टोटल पोलर कंपाऊंड्स तयार होतात. यामुळं उच्च रक्तदाब, धमनीकाठिण्य, अल्झायमर, यकृताचे आजार होतात. हे लक्षात घेऊन खाद्यतेलासंबंधी नियमांचे व तरतुदींचे तंतोतंत पालन करुन प्रशासनास सहकार्य करावं, असे आवाहन देसाई यांनी केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: