रत्नागिरी : कोकण रेल्वेवरील सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जेवणातून विषबाधा झाली आहे. एकूण 15 प्रवाशांना त्रास होऊ लागल्यानं तेजस एक्स्प्रेस चिपळूण स्थानकाजवळ थांबवण्यात आली आहे. या प्रवाशांना उपचारासाठी चिपळूणमधील लाईफकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देशातील वेगवान एक्स्प्रेस म्हणून तेजस एक्स्प्रेस ओळखली जाते. करमाळीहून दर रविवारी तेजस सीएसटीच्या दिशेनं धावते. आज सकाळी आपल्या नियोजित वेळी तेजस निघाली मात्र चिपळूणजवळ पोचताच काही प्रवाशांना फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ लागला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

काय आहे तेजस एक्स्प्रेस?

200 किमी प्रतितास वेगाने धावणारी तेजस ही देशातील पहिली ट्रेन आहे. तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठी रेल्वेला 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करावे लागले आहे. याचे दरवाजे स्वयंचलित आहेत.  शिवाय यात सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग इत्यादी सुविधाही आहेत.

ही ट्रेन आठवड्याच्या पाच दिवस धावणार धावते. ट्रेनला एकूण 7 थांबे आहेत. तेजस एक्स्प्रेस अवघ्या 8.30 तासात गोव्यातील करमाळी स्टेशनवर पोहोचते. तर पावळ्यात कोकणातील परिस्थिती पाहता ट्रेनला करमाळीला पोहोचण्यासाठी 10.30 तास लागतात.

तेजस ट्रेनमध्ये विमानाप्रमाणे सोईसुविधा पुरवण्यात आलेल्या असून अत्याधुनिक रेल्वे प्रवासाचं स्वप्न तेजसच्या माध्यमातून पूर्ण होतं आहे. संपूर्ण ट्रेनवर खास प्रकारचं पॅटर्न छापण्यात आला आहे. तेजस ट्रेनचं भाडं शताब्दी ट्रेनच्या तुलनेत जास्त आहे.

पावसाळी वेळापत्रक

सोमवार, बुधवार, शनिवार
सीएसटी – पहाटे 5.00 वाजता
करमाळी – दुपारी 3.40 वाजता

परतीचा प्रवास
मंगळवार, गुरुवार, रविवार
करमाळी – दुपारी 2.30 वाजता
सीएसटी – रात्री 11 वाजता

पावसाळा वगळता
बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार
सीएसटी – पहाटे 5 वाजता
करमाळी – दुपारी 1.30 वाजता

परतीचा प्रवास
करमाळी – दुपारी 2.30 वाजता
सीएसटी – रात्री 11 वाजता

तेजसचे थांबे
सीएसटी, दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी