पंढरपूर : अतिवृष्टी आणि उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपुरात भीमेला आलेल्या पुरामुळे शहर आणि तालुक्यातील तब्बल 3305 घरांमध्ये पाणी शिरले. यामध्ये असून घरांचे आणि शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारनंतर उजनीतून येणारा विसर्ग कमी झाल्यांने पंढरपूरचे पाणी ओसरण्यास रात्री उशीरापासून सुरूवात झाली आहे. या दोन दिवसात 17 हजारापेक्षा जास्त नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
या पूरपरिस्थितीत कोल्हापूरच्या वजीर रेस्क्यू फोर्स आणि व्हाईट आर्मीच्या जवानांनी शहर व तालुक्यात अनेक नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढायचे काम केले. प्रदक्षिणा मार्गावरील नागपूरकर मठाजवळ राहणारे विठ्ठल पोतदार यांचे वार्धक्याने निधन झाले होते. मात्र त्यांच्या घराजवळ तीन फूट पाणी असल्याने त्यांचा मृतदेह वजीर फोर्सच्या जवानांनी बाहेर काढून अंत्यसंस्कारासाठी सोडला. याच पद्धतीने संत पेठ येथील एका प्रसूत झालेल्या महिलेला व नवजात बालकालाही बाहेर काढले.
गेले दोन दिवसांपासून पंढरपूरकडे येणारे सर्व मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले होते. चांद्रभागेवरील नवीन पूल व अहिल्या पुलावर पाच फूट पेक्षा जास्त पाणी असल्याने शहरातून एकही वाहनाला बाहेर पडत येत नव्हते. यामुळे शहरातील विविध मार्गावर हजारो ट्रक्स अडकून पडले आहेत. उद्या सकाळपर्यंत हळूहळू पाणी कमी झाल्यावरही वाहने बाहेर पडू शकणार आहेत.
आज शहरातील खिस्ते गल्ली, हरिदास वेस, कालिकादेवी चौक, काळामारुती, आंबेडकर नगर, घोंगडे गल्ली आदी ठिकाणी पुराचे पाणी शिरले होते. या ठिकाणी रस्त्यावर होड्या फिरताना दिसून आल्या. शहर तालुक्यात तब्बल 16 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले. यामध्ये शहरातील स्थलांतरीत नागरिकांना श्री विठ्ठल मंदिर समितीने दोन वेळचे जेवण दिले.
अतिवृष्टीमुळे शहरासह तालुक्यातील 95 गावे बाधित झाली असून, तालुक्यातील 3305 कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे.अतिवृष्टीमुळे पंढरपूर शहरात 6 तर भंडीशेगांव येथील 1 अशा सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच तालुक्यातील 440 घरांची पडझड झाली असून 4 बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह 4 हजार कुटुंबातील 16 हजार नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. शुकवारी सकाळपासून उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला. दुपारी 4 वाजता अकलूज जवळील संगम येथे 1 लाख 90 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता.
तर चंद्रभागा नदी येथे 2 लाख 89 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता. तसेच संध्याकाळी पुराचे पाणी हळूहळू ओसरायला सुरवात झाली आहे. उजनीचा विसर्ग कमी होऊ लागल्याने चंद्रभागा नदीचे पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. एकंदरीत शनिवारी सखल भागातील पाणी ओसरू लागेल अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. असे असले तरी दोन दिवस पुराचा विळखा पंढरपूरला बसला असून अतोनात नुकसान झाले आहे.
Pandharpur Rains | 2006 नंतर पंढपुरात भीषण पूरस्थिती