जळगाव : ध्वजारोहण म्हटलं की मंत्री,कलेक्टर यांच्या हस्ते केलं जात असल्याच पहायला मिळत असते. याला काहीसा छेद देत गिरीश महाजन यांनी स्थापन केलेल्या कोविड उपचार केंद्रावर आज स्वातंत्र्य दिवसाच्या ध्वजारोहणाचा मान हा जळगाव जिल्ह्यात पाहिला कोरोनामुक्त रुग्ण झालेल्या मौलाना फिरोज शेख यांना दिला आहे. तर दुसऱ्या घटनेत चोपडा तालुक्यात मानव सेवा तीर्थ या संस्थेने चोपडा उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करणाऱ्या प्रशांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.


देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहणच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. यामध्ये प्रामुख्याने मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनाच प्राधान्य दिले जात असते. जळगाव जिल्ह्यात देखील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे सामाजिक संस्थांनी केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात मात्र नावीन्य पाहायला मिळाले आहे.


सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. कोरोनाच्या विषयी अनेक नागरिकांच्या मनात अनेक प्रकारच्या भीती आहे तसा सामाजिक न्यूनगंड असल्याच ही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा रुग्ण होणं हा काही गुन्हा नाही आणि जरी आपण कोरोना पॉझिटिव्ह आलो तरी त्यातून वेळीच उपचार केले तर आपण बरे होऊ शकतो हा संदेश देण्यासाठी कोरोनायोद्धांच्या हस्ते ध्वजारोहण केले.


जळगाव जिल्हयातील पहिल्या कोरोना मुक्त झालेल्या मौलाना फिरोज शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी उभारलेल्या कोविड उपचार केंद्रात आज जळगाव जिल्ह्यातील शिरसोली रोडवर असलेल्या रायसोनी इंजिनिअरींग कॉलेज येथे हा कार्यक्रम पार पडला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत चोपडा तालुक्यात उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करणाऱ्या प्रशांत पाटील या तरुणाचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. चोपडा शहरातील मानव सेवा तीर्थ या संस्थेच्या वतीने या या कार्यक्रमाच आयोजन केले होते. तळागाळात काम करणाऱ्या दुर्लक्षित घटकांच्या कामाचा सन्मान व्हावा म्हणून ही संस्था दर वर्षी अशा प्रकारच्या व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम करत असते. दोन्ही संस्थाननी घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व सामान्य जनतेतून कौतुक होतांना दिसून येत आहे.