उस्मानाबाद : महाराष्ट्रातून जम्मू काश्मिरला गेलेल्या आमदारांच्या पथकावर अतिरेक्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून पाचही आमदार सुदैवाने बचावले.


महाराष्ट्रातले पाच आमदार पंचायत राज समितीच्या कामानिमित्त 19 मे रोजी जम्मू काश्मिरला गेलेले आहेत. या पथकामध्ये राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे आणि आमदार दीपक चव्हाण, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील आणि आमदार तुकाराम काते तर भाजपचे आमदार सुधीर पारवे यांचा समावेश आहे.

जम्मू आणि काश्मिरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात बिज बिहारीमध्ये एका गजबजलेल्या गावात अतिरेक्यांनी हा हल्ला केला. आमदारांच्या गाडीत काही अधिकारीही होते, मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नाही

आमदारांनी या घटनेची माहिती विधिमंडळाला दिली आहे. आमदारांच्या गाड्यांचं नुकसान झालं असून दोन गाड्या पंक्चर झाल्या आहेत.

आमदार - पक्ष - मतदारसंघ

किशोर आप्पा पाटील- शिवसेना- पाचोरा (जळगाव)

दीपक चव्हाण- राष्ट्रवादी- फलटण (सातारा)

तुकाराम काते - शिवसेना- मानखुर्द (मुंबई)

विक्रम काळे- राष्ट्रवादी- औरंगाबाद शिक्षक मतदार संघ

सुधीर पारवे- भाजप - उमरेड (नागपूर)