मुंबई : आजपासून मुंबईत सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, तसंच अधिवेशनाच्या अल्प कालावधीवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तसंच अधिवेशनाच्या कामकाज सुरु होतात, फक्त दोन दिवसांचंच अधिवेशन का असा सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या घोषणांची पूर्तता कधी होणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते फडणवीसांनी उपस्थित केला. तसंच आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी बॅनर घालून सभागृहात हजेरी लावली.


धनगर आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष वेधताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पारंपरिक वेशभूषेत हटके आंदोलन केलं. पडळकर ढोल बडवत विधानभवन परिसरात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पडळकरांची त्यांच्याशी बाचाबाची झाली. यावेळी पडळकर मागण्यांचा एक भलामोठा फलक घेऊन आले होते. दरम्यान पडळकरांच्या समर्थनासाठी  रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे नेते धावून आले. हे नाट्य संपत नाही तोच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी हुतात्मा चौक इथे जाऊन केंद्रीय कृषी कायद्याला दुग्घाभिषेक घातला. त्यानंतर सदाभाऊ घोत आणि पडळकर ही जोडी विधानभवनात जाण्यासाठी परतली. मात्र त्यांना प्रवेशद्वाराजवळ रोखण्यात आल्याचा दाव करत त्या दोघांनी तिथेच ठिय्या मांडला. काही वेळांनी त्या दोघांना विधानभवन परिसरात प्रवेश देण्यात आला.


महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती विधेयक राज्य सरकारनं आणलं आहे. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे विधेयक विधानसभेच्या पटलावर ठेवले. या बिलावर चर्चा होऊन नंतर विधिमंडळात यावर मंजुरी मिळणार आहे.


अधिवेशनात सहा अध्यादेश, 10 विधेयके मांडण्यात येणार
विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा अध्यादेश, 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोना आणि बेमोसमी पाऊस या संकटांशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले होते.


राज्य शासन गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनासारख्या आजारासोबत यशस्वी लढा देत आहे. याकाळात जनहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले, असे सांगतानाच हिवाळी अधिवेशनात अध्यादेश, विधेयक, पुरवण्या मागण्या, विनियोजन बिल, शोकसंदेश असे कामकाज असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.


सरकारने माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला; हटके आंदोलन करणारे गोपीचंद पडळकर 'माझा'वर